मनोरंजनमराठी

मास्टर कृष्णराव यांना सांगीतिक मानवंदना

गुरुपौर्णिमेनिमित्त कलांगण, मुंबईतर्फे अनोखे सादरीकरण

Spread the love

पुणे : संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव म्हणजे संगीत क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेली वेगवेगळ्या धाटणीची गीते सादर करून त्यांना गुरुपौर्णिमेच्यानिमित्ताने आदरांजली वाहण्यात आली. ७ वर्षापासून ते २५ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी गायन, वादन, निवेदनाची बाजू सांभाळत कल्पकता आणि कलात्मकतेची चुणूक दर्शविली.

कलांगण, मुंबई संस्थेच्या संस्थापिका वर्षा भावे यांच्या संकल्पनेतून आणि दिग्दर्शनातून शनिपार येथील भारत गायन समाज येथे या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शास्त्रीय संगीत, भारूड, गवळण, अभंग, भक्तिगीते, नाट्यगीतांसह चित्रपटगीते अशा विविध गीत प्रकारांना मास्टर कृष्णराव यांनी दिलेल्या चाली आजही स्मरणात राहणाऱ्या आहेत. गुरुपौर्णिमेच्यानिमित्ताने गुरूंना वंदन करण्याच्या उद्देशाने मास्टर कृष्णराव यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

‘बात कान सुनिये जी’, ‘किस्न्याची माया लय भारी’, ‘असा नेसून शालू हिरवा’, ‘क्षण आला सौख्याचा’, ‘काका अप्पा शूर शिपाई’ यासारखी वैविध्यपूर्ण धाटणीची गीते विद्यार्थ्यांनी सादर केली. ‘लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ या अजरामर गीताने झालेली सांगता हा क्षण कार्यक्रमाचा कळसाध्याय ठरला.

श्रीरंग जोशी, सानिका फडके, जुई देशपांडे, विभा हरिश्चंद्रकर, तनय नाझिरकर, भार्गव वैद्य, इवा जोशी यांनी गीते सादर केली. अन्वी पाटणकर (संवादिनी), सिद्धी देशपांडे, इरा परांजपे (व्हायोलिन), ऋषभ गोडबोले (की-बोर्ड), अभय ओक (बासरी), आदित्य केळकर, वेदांग जोशी (तबला), मानस कांबळे (तालवाद्य) यांनी समर्पक साथसंगत केली. तर आद्या दामले आणि वर्षा भावे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

मास्टर कृष्णराव या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला आदरांजली वाहताना लहान मुलांनी समजून-उमजून केलेले सादरीकरण कौतुकास्पद ठरले. मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेली सुमधुर पदे सादर करत बालकलाकरांनी कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेत सादरीकरणाचे शिवधनुष्य पेलले.

लहान वयापासूनच मुलांना संगीत, वाद्य याची गोडी लागावी यासाठी कलांगण संस्था काम करीत असल्याचे संस्थेच्या संचालिका वर्षा भावे यांनी रसिकांशी संवाद साधताना सांगितले. मास्टर कृष्णराव यांनी आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात केलेल्या पुण्यात पहिल्यांदाच कार्यक्रमाचे सादरीकरण करता आले, याचे समाधान असल्याचेही त्या म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!