आधार संच वितरणात पुणे जिल्हा विभागात प्रथम

पुणे, : माहिती व तंत्रज्ञान विभाग मुंबई यांच्याकडून पुणे जिल्ह्यास एकूण २०३ आधार संच प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने १२२ रिक्त आधार केंद्रांकरिता कालबद्ध कार्यक्रम राबवून आधार संच वितरणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून आधार संच वितरणात पुणे जिल्हा विभागात प्रथम असल्याचे उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक महसूल मंडळ, नगर पालिका व पुणे महानगर पालिका व पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात वाढती लोकसंख्या विचारात घेता तसेच शहरी भागात लोकांचे होणारे स्थलांतरण विचारात घेता आधार संचांची आवश्यकता होती. ९ ते २३ मे २०२५ दरम्यान जिल्हास्तरावर आधार संच वितरणाबाबतचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. ग्रामीण कार्यक्षेत्राकरिता ६५ महसूल मंडळ, नगर पालिकेकरिता ७, पुणे मनपाकरिता २२ व पिंपरी चिंचवड मनपाकरिता २८ रिक्त केंद्र अशाप्रकारे एकूण १२२ रिक्त आधार केंद्रांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
आधार संच मिळणेकरिता अर्जदाराकडे आपले सरकार सेवा केंद्र असणे, शासकीय जागेचे ना हरकत प्रमाणपत्र असणे, अर्हता पात्र सुपरवायझर असणे इत्यादी अटी निश्चित करण्यात आल्या होत्या. पात्र अर्जदारांमधून जिल्हाधिकारी कार्यालयात १२ जून २०२५ रोजी सोडतीद्वारे (लकी ड्रॉ) सर्व अर्जदारांसमक्ष अंतिम अर्जदारांची निवड करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यापूर्वी वितरण झालेले आधार संच जुने झालेले असल्याने त्यांना नविन आधार संच बदलून देण्याबाबत शासनाची मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेली आहे. त्यानुसार जिल्हास्तरावरुन कार्यवाही सुरू आहे. अंतिमरित्या पात्र ठरलेल्या आपले सरकार सेवा केंद्र धारकांना नुकतेच धान्य गोदाम वडकी येथे आधार संचांचे वितरण श्रीमती घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले.
नविन आधार संच प्राप्त झालेल्या संच चालकांच्या प्रतिक्रिया:
श्रीमती रुपाली प्रशांत कुमावत, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका : आधार संच वितरणाची प्रक्रिया ही खुल्या जाहिरात देऊन राबविल्याने आमच्यासारख्या गरजू व्यक्तीला न्याय मिळाला. लॉटरीद्वारे अर्जदारांची निवड केल्याने आधार संच वितरणाबाबत कोणतीही शंका राहिली नाही.
भूषण पाटील, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका : वृत्तपत्रात देणेत आलेली जाहिरात व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर वेळोवेळी दिलेल्या सूचना यामुळे आधार संच वितरणाचे कामकाज हे गतीशील राहिले. आधार संच वितरण प्रक्रियेबाबत समाधानी आहे.
संदीप कांबळे, आंबवणे मंडळ, वेल्हे : वेल्हे (राजगड) सारख्या दुर्गम भागात आधारच्या कामासाठी नागरिकांना ४० ते ५० किमी दूर जावे लागत होते. वेल्हे तालुक्यातील बारा मावळ खोरे, वेल्हे, कानंद पासली, पानशेत या दुर्गम भागातील वृद्ध, महिला, विद्यार्थी व लहान मुले यांना याचा फायदा होणार आहे.