व्हीके ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
सामाजिक बांधिलकी जपत ११६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

पुणे – शहरातील अग्रगण्य मल्टी-डिसीप्लिनरी कन्सल्टन्सी संस्था व्हीके ग्रुपने आपल्या ५2व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत एक उल्लेखनीय रक्तदान शिबिर आयोजित केले. व्हीके ग्रुपच्या ‘सस्टेनॅबिलिटी इनिशिएटिव्हज् ट्रस्ट’च्या पुढाकाराने व दीनानाथ मंगेशकर रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबिर सेनापती बापट रस्ता येथील मुख्य कार्यालयात पार पडले. या शिबिरात एकूण १६१ इच्छुकांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ११६ स्वयंसेवकांनी रक्तदान करत समाजाप्रती आपली निष्ठा आणि सेवा-भावना दाखवली.
या उपक्रमात केवळ व्हीके ग्रुपचे कर्मचारीच नव्हे, तर ईबिक्स कॅश, बहिरट रिॲलिटी, वोनीट, हाय गार्डन, प्रचय कॅपिटल, जेनिसिस टेक्नॉलॉजी या सहकारी संस्थांचे कर्मचारीही सक्रियपणे सहभागी झाले. या माध्यमातून वर्धापनदिनाचा आनंद सामाजिक सेवेत रूपांतरित करत संस्थेने समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी अधोरेखित केली.
रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्हीके ग्रुपचे संस्थापक विश्वास कुलकर्णी, संचालिका अनघा परांजपे-पुरोहित, मेघना पिंगळे, सस्टेनॅबिलिटी इनिशिएटिव्हजचे अमोल उंबरजे, तसेच दीनानाथ मंगेशकर रक्तपेढीचे डॉ. लक्ष्मण उगाडे, अनिकेत पाटील आणि अक्षय आगम आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी रक्तदात्यांचे स्वागत करत त्यांच्या योगदानाचे मनःपूर्वक कौतुक केले.
अपूर्वा कुलकर्णी यांनी सांगितले की, “रक्त हे कोणत्याही रुग्णालयात तयार करता येत नाही, त्यामुळे रक्तदान ही सर्वोच्च मानवसेवा आहे. आपत्तीच्या क्षणी रक्ताचा थेंब एखाद्याचे प्राण वाचवू शकतो. म्हणूनच व्हीके ग्रुप दरवर्षी असा उपक्रम राबवत सामाजिक उत्तरदायित्व जपतो.”
हा उपक्रम म्हणजे व्यवसायिक यशासोबत सामाजिक जाणिवांचा सुंदर समन्वय असून, पुण्यासारख्या प्रगत शहरात सकारात्मक बदल घडवण्यास निश्चितच दिशा देणारा आहे. अशा उपक्रमांनी समाजमन जागृत होत असून, व्हीके ग्रुपने या निमित्ताने एक सामाजिक उदाहरण उभे केले आहे.