
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्री संत तुकाराम महाराज पालखीचे आळंदीत नाम जयघोषात आगमन झाले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या. जन्मोत्सवी वर्षा निमित्त तसेच श्री संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा सदेह वैकुंठ गमन सोहळा या निमित्त आळंदीत संतांचे पालख्याचे आगमन हरिनाम गजरात झाले. श्री भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी वारी आषाढ यात्रेहून परतीचे प्रवासात अठरा वर्षानंतर श्री संत ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे आगमन एकाच वेळी मागेपुढे रविवारी आगमन झाले. या सोहळ्याचे लांडीत फटाक्यांची आतिषबाजी, रांगोळ्यांचे पायघड्या आणि पुष्पवृष्टी करून मोठ्या मंगलमय, भक्तिमय वातावरणात सोहळ्याचे आगमन झाले. हजारो भाविक, वारकरी, पंचक्रोशीतील नागरिक, शालेय मुले, वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणारे मुले, मुली यांचेसह आळंदी ग्रामस्थ व पंचक्रोशीचे वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.
आळंदी नगरपरिषद चौकात आळंदी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांनी सोहळ्याचे प्रवेश प्रसंगी सोहळ्याचे स्वागत करीत माऊली देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा सत्कार केला. आळंदी नगरपालिका चौकात भगवी शाल, पुष्पमाला व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी भाविक वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते सुनील घुंडरे पाटील , नितीन घुंडरे पाटील यांनी सोहळ्याचे स्वागत केले. श्रींचे सोहळ्यातील संस्थानचे तसेच पालखी सोहळ्याचे पदाधिकारी, मालक, चोपदार, मानकरी, बैलसेवेचे मानकरी यांचा सत्कार आळंदीत करण्यात आला.