शाश्वत ग्रामीण विकासासाठी ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिनाचे महत्त्व’
महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा ; नोंदणीकृत ९५० गोशाळा आणि पशुपालकाच्या दारात अंदाजे सव्वा कोटी देशी गोवंश

पुणे : राज्यात दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली असून देशी गोवंशाच्या विकासासाठी आयोगाकडून कार्य आणि उपक्रम राबवण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. राज्यातील देशी गोवंश आपल्या अंगीकृत गुणांमुळे जगात वैशिष्ट्यपूर्ण असून त्याची जोपासना आणि सांभाळ ग्रामीण पशुपालकांच्या शेती पद्धतीशी निगडित आहे. भारतीय उपखंडात गोवंश निगडीत ग्रामजीवन, पीक पद्धती, कुटुंब पोषण आणि आर्थिक नियोजन वर्षानुवर्ष राबवण्यात आले आहे. देशी गोवंशाचा सांभाळ परंपरेतून सुधारणांकडे आणि पुढे आधुनिक व्यवस्थापनातून जैवतंत्रज्ञानाकडे मार्गक्रमित झाला असून आता कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ २२ जुलै रोजी साजरा करण्यात येणार असून शाश्वत ग्रामीण विकासासाठी दिनाचे महत्त्व आनन्यसाधारण आहे, असे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेला आयोगाचे सदस्य डॉ. नितीन मार्कंडेय, सदस्य संजय भोसले, सदस्य सचिव डॉ. मंजुषा पुंडलिक आदी उपस्थित होते.
शेखर मुंदडा म्हणाले, महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या केंद्रस्थानी राज्यातील नोंदणीकृत ९५० गोशाळा आणि पशुपालकाच्या दारात असणारा अंदाजे सव्वा कोटी देशी गोवंश असल्याने सर्वंकष विकासासाठी योजना आणि अंमलबजावणी करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या पशुगणनेच्या संख्यात्मक बाबी उपलब्ध होताच देशी गोवंश विकास आणि वर्गीकृत स्थानिक गोवंशाचा शुद्ध देशी गोवंशाबाबत परिवर्तनासाठी प्रयास केला जाणार आहे. राज्यातील गोवंश जनमानसात राज्यमाता म्हणून पूर्वापार वसलेला असला तरी शासनाच्या अधिकृत घोषणेमुळे त्याचा सांभाळ आणि विकास अधिक उत्कृष्टपणे घडून येणार आहे.
ते पुढे म्हणाले, शुद्ध देशी गोवंशाचा पालन पोषण आणि सांभाळ आर्थिक दृष्ट्या सुलभ करण्यासाठी नवीन व्यवस्थापन पद्धती, चारा नियोजन, गोमय मूल्यवर्धन, गोपर्यटन, गोप्रक्षेत्र सुविधा वर्धन ( सूर्यचूल, गोबर गॅस, इ- कुंपण, नोंदवही) असे उपक्रम राज्यात गोशाळांच्या माध्यमातून आदर्श निर्माण करून ग्रामीण पशुपालकांसाठी पथदर्शक अंमल करण्यात येणार आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठे आणि पशुवैद्यक विद्यापीठ तसेच देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्या शास्त्रीय शिफारसी गोशाळांसाठी मार्गदर्शक ठरतील अशी पद्धती राबविण्यात येत आहे. देशी शुद्ध गोवंश उपयुक्त ठरण्यासाठी गतवर्षी राज्यात ३०० हून अधिक ठिकाणी गो आधारित सेंद्रिय शेतीची शिबिरे आयोजित करून शेतकरी पशुपालकांचे प्रबोधन करण्यात आले आहे.
*सर्व शुद्ध देशी गोवंशाचा सन्मान – डॉ. नितीन मार्कंडेय
डॉ. नितीन मार्कंडेय म्हणाले, राज्याच्या शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिनात देशातील नामवंत आणि राज्यात हौसेने सांभाळल्या जाणाऱ्या सर्व शुद्ध देशी गोवंशाचा सन्मान अपेक्षित असून राज्यातील स्थानिक गोवंश हा नेहमी अधिक उपयुक्त असतो आणि त्याचा ग्रामीण भागात जास्त फायदेशीर उपयोग करून घेतला जातो याबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यात येत आहे. २१ व्या शतकाच्या विज्ञान युगात शास्त्रीय धोरणात राज्यातील देशी गोवंश संवर्धनाचा विचार अधिक दृढपणे रुजला जावा, यासाठीच शासनाने शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिनाची प्रेरणा दिली आहे.
नवीन विकसित भारतात शुद्ध देशी गोवंशाची बीजे रोवण्याचे कार्य गेल्या पंचवीस वर्षात प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. यातूनच शुद्ध देशी गोवंशाच्या समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण शासन धोरण आखण्यात येत आहे. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाची स्थापना २००३ हे शुद्ध गोवंश जतन आणि संवर्धनाचे पहिले पाऊल समजण्यात येते. शुद्ध देशी गोवंशाच्या सांभाळातून गो आधारित सेंद्रिय शेतीचे धोरण ग्रामीण भागात स्वीकृत झाल्यानंतर राज्यातील स्थानिक असणाऱ्या शुद्ध गोवंशाच्या पाच जाती म्हणजे खिलार, देवणी, लाल कंधार, डांगी आणि गवळवू यात केंद्र शासनाच्या नियमावलीप्रमाणे गेल्या काही वर्षात कोकण कपिला आणि कठाणी गोवंशाची भर पडली आहे. राज्यातील शुद्ध देशी गोवंश संख्यात्मक आणि गुणात्मक स्वरूपात समृद्ध होण्यासाठी राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग आणि प्रामुख्याने महाराष्ट्र गोसेवा आयोग सरसावला आहे.
शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिवसाच्या निमित्ताने राज्यातील एकही शुद्ध देशी गोवंश पैदास धोरणातून दुर्लक्षित राहणार नाही यासाठी राज्य शासनाने पारित केलेला पशु प्रजनन पैदास विनीयमन कायदा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शासकीय यंत्रणेमार्फत उपलब्ध असलेल्या शुद्ध गोवंशाची अनुवंशिकता वाढवण्यासाठी तसेच अवर्गीकृत गोवंश शुद्ध गोवंशात पुढील पिढ्यातून परावर्तित करण्यासाठी धोरणात्मक आणि कार्यात्मक बदल अवलंबले जाणार आहेत. कृत्रिम रेतन करताना, भ्रूण प्रत्यारोपण अवलंबताना आणि लिंगवर्धित रेतमात्रांचा वापर होताना गोवंशाची शुद्धता कुठेही बाधित होणार नाही याची काळजी कायद्याने घेतली जाणार असून, चुकीच्या पैदास अवलंबासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे.
पाळीव प्राण्यांच्या यादीत पशुधनाचा समावेश होतो, मात्र पशु हा शब्द त्याच्या गुणांकित उपयुक्ततेमुळे वापरण्यास टाळणे, हितावह असल्याचे नुकतच आपल्या सन्माननीय राष्ट्रपती महोदयांनी सुचवले आहे. गोवंशांकडून मानवास मिळणारे जीवनधन आर्थिक फायदेशीर अनेक प्रकारे असून वंशवृद्धी, गोमय, गोमूत्र, पियुष, गर्भजल, वार आणि गोसहवास यांचा आत्मानुभव सर्वत्र प्रसारित होणाऱ्या यश कथा, संदर्भ निर्मिती, संशोधने, पेटंट उपलब्धता यातून सिद्ध होतात. महाराष्ट्राच्या इतिहासात देशी गोवंश जतन आणि संवर्धन करण्यासाठी ग्रामीण पशुपालकांच्या योगदानाचे अनन्य साधारण महत्त्व आहे.