धर्मब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

वाडा संस्कृती ही आपली व भारताची संस्कृती – सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई

 किरण सोशल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक संस्थांचा गौरव आणि विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान

Spread the love

पुणे : एकत्र येऊन चांगले व विधायक काम करावे, एकमेकांची सुख, दु:ख वाटली जावी, हा विचार आज हरवला आहे. आपला सगळा वेळ भांडण्यात जातो. वाडा संस्कृती आजच्या पिढीला माहीत नाही. वाडा संस्कृतीत सुख आणि दु:खात देखील सगळे सोबत असायचे. वाडा संस्कृती ही आपली व भारताची संस्कृती होती. आपण श्रीमंत झालो आणि फ्लॅट मध्ये जाताना आपली संस्कृती, प्रेम, जिव्हाळा या गोष्टी देऊन टाकल्या. वाडा पडताना त्या सगळ्या भावना पडल्या. फ्लॅट संस्कृतीत या भावनेच्या भिंती आपण भक्कम करायला हव्या, असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांनी व्यक्त केले.

किरण सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रथम वर्धापनदिनानिमित्त सामाजिक संस्थांचा गौरव आणि विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमाचे आयोजन धायरी फाटा येथील सिल्व्हर पेटल्स हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर व डॉ.मिलिंद भोई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष विपुल म्हैसूरकर, उपाध्यक्ष रविंद्र सरवदे,ऋचा देशपांडे, सुशांत बरकडे,दीपाली पाटील,निलेश कुलकर्णी,अतुल धुमाळ, संतोष ठाकूर,अजिंक्य देशपांडे, स्वप्ना म्हैसूरकर,सौरभ गंधे, रेणुका सरवदे,अमोल नागटिळक,पूजा बरकडे,चेतन पानसरे, अमोल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

समाजातील विविध घटकांसाठी काम करणाऱ्या सेवाधाम वृद्धाश्रम, ज्ञानगंगोत्री प्रतिष्ठान, जिव्हाळा फाउंडेशन, अद्वैत परिवार, पुणे विद्यार्थी गृह या सामाजिक संस्थांचा सन्मान यावेळी करण्यात आला. तसेच दहावीतील गरजू विद्यार्थ्यांना ’स्वर्गीय इंदिराबाई रामचंद्र म्हैसूरकर शिष्यवृत्ती’ तर बारावीतील गरजू विद्यार्थ्यांना ’स्वर्गीय पुतळाबाई नामदेव सरवदे शिष्यवृत्ती’ प्रदान करण्यात आली.

डॉ. मिलिंद भोई म्हणाले, कोणत्याही प्रश्नाकडे पाहताना आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. कोणत्याही समस्येकडे वेगळ्या नजरेने पाहिले, तर समस्या सुटू शकते. समाजात चांगले काम करणाऱ्या लोकांचे कौतुक करणे, हे आज दुर्मिळ होत चालले आहे. चांगल्या कामाच्या पाठीशी आपण उभे राहायला हवे आणि हे काम आज किरण सोशल फाउंडेशन उत्तमरित्या करत आहे.आज दुर्जन सशक्त नाहीत, तर सज्जन दुर्बल झाले आहेत. यामुळे ही वाईट परिस्थिती पाहायला मिळत आहे.

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर म्हणाले, भारत देशामधील आई ही वेगळी आहे. परदेशात आईची संकल्पना वेगळी आहे. आई हा शब्द येतो, तेव्हा सगळ्यांनाच आईची माया आठवते. परमेश्वर हा माणसामध्ये आहे, तो बघता आला पाहिजे. आजच्या पिढीला चांगले विचार देणे गरजेचे आहे. समाज बिघडत चाललेला आहे, हे आपण फक्त म्हणतो. पण आपली जबाबदारी आपण विसरत चाललो आहोत का? हे पाहण्याची आवश्यकता आहे. संस्कार, संस्कृती, विचार पुन्हा एकदा निर्माण करण्याची गरज आहे. आपण चांगले म्हणून एकत्र येत चांगला विचार प्रस्थापित करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

विपुल म्हैसूरकर यांनी प्रस्तावना करत फाउंडेशन स्थापन करण्या मागचा हेतू व आगामी काळात करावयाच्या कामाची माहिती दिली. उपाध्यक्ष रविंद्र सरवदे यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचे सादरीकरण केले, तर ऋचा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!