अचूक वीजबिलासाठी टीओडी मीटर महत्वाचे महावितरणची भूमिका

पुणे, महावितरणकडून वीजग्राहकांना टीओडी (Time of Day) वीजमीटर मोफत बसविले जात आहेत. पुणे परिमंडलात आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या ४ लाखांहून अधिक ग्राहकांना वीजमीटर बसविण्यात आले असून, त्यांचे अचूक वीजबिल तयार होत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी अफवांना बळी न पडता सदरील मीटर बसविण्यास सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजग्राहकांना त्यांचे वीजबिल त्यांच्या वापरानुसार अचूक व वेळेत मिळावे ही अपेक्षा असते. त्यामुळे महावितरण देखील रिडींगसाठी नवनवीन तंत्रज्ञान स्विकारुन वीजबिल तयार करत असते. बदलत्या युगात बहुतांश गोष्टी ऑनलाईन उपलब्ध आहेत. तसे वीजमीटरचे रिंडीग घेण्यासाठी लागणारा वेळ व त्यात होणाऱ्या मानवी चुका टाळण्यासाठी महावितरणने आता टीओडी मीटर बसविण्याचे धोरण स्विकारले आहे. त्यासाठी ग्राहकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. महावितरणतर्फे हे मीटर मोफत बसविण्यात येत आहेत.
हे मीटर अत्याधुनिक आहेत. यात ग्राहकाला त्याचा वीजवापर मोबाईलमधून केंव्हाही व कोठूनही तपासता येतो. त्यासाठी ‘महाविद्युत’ हे ॲप विकसित करण्यात आले आहे. नवीन मीटरमुळे महावितरणला रिडींग घेण्यासाठी कोणा बाह्यव्यक्ती अथवा कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे ठरलेल्या तारखेला व काही क्षणांत मीटरची रिडींग ऑनलाईन प्राप्त होते. शिवाय ती अचूक असते. त्यामुळे वीजबिल विनाविलंब तयार होऊन ग्राहकाला उपलब्ध होते. तसेच सौरऊर्जेमुळे महावितरणला स्वस्त विजेची उपलब्धता दिवसा अधिक होत आहे. ही स्वस्त वीज ग्राहकांना दिवसा उपलब्ध करुन देण्यासाठी टीओडी मीटर आवश्यक आहे. कारण आता दिवसाच्या वीज वापरावर सूट दिली जाणार असून या मीटरमध्ये टीओडी (Time of Day) सुविधा देखील उपलब्ध आहे.
मीटर प्रीपेड नसून, पोस्टपेडच
दुसरी अफवा म्हणजे ही मीटर प्रीपेड आहेत त्यामुळे रात्री अपरात्री रिचार्ज संपल्यावर काय करायचे अशाही अफवा सोशलमिडीयावर येत आहेत. यातही तथ्य नाही. सदरचे मीटर पूर्वीच्या मीटरप्रमाणेच पोस्टपेड असतील. महिनाभराच्या वापरानंतर त्यांना नेहमीसारखेच घरपोच किंवा ऑनलाईन वीजबिल मिळणार आहे.
वीजबिल जास्त येत नाही- काकडे
काही ठिकाणी नविन मीटरचे फायदे समजून न घेता ते बसविण्यापूर्वीच अनाठायी विरोध केला जात आहे. विजेचे बिल जास्त येत नाही तर ते अचूक असेल. ज्या ग्राहकांना मीटरवर शंका आहे. त्यांनी महावितरणच्या विभागाशी संलग्न असलेल्या मीटर चाचणी कक्षात त्याची प्रत्यक्ष पडताळणी करु शकतात. इथे जुन्या व नवीन मीटरवर समान वीजभार टाकून ग्राहकाला मीटर तपासून देण्याची सोय आहे. त्यामुळे ऐकीव किंवा सोशल मिडीयावर आलेल्या अफवांना बळी पडू नये.
सुनील काकडे
मुख्य अभियंता, महावितरण पुणे परिमंडल