गुन्हेगारीला शहरातून पूर्णपणे काढून हद्दपार करू पोलीस आयुक्त अमितेश कुमार
गरजवंत ५०० विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य

पुणे : पोलीस दल संपूर्ण कार्यक्षमतेने शहराला शिस्तीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी सर्वांचे प्रेम आणि विश्वास आम्हाला लाभत आहे. यामुळे आम्ही पुढील काळात गुन्हेगारीला शहरातून पूर्णपणे काढून हद्दपार करून टाकू, असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट चा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये सदाशिव पेठेतील महाराष्ट्र विद्यालयातील गरजवंत ५०० विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. यामध्ये ३ हजार फुलस्केप वह्या आणि ५०० पॅड चा समावेश आहे.
कार्यक्रमाला सद्गुरू मनोहर भोसले, राज्याच्या अंमलीपदार्थ विरोधी फोर्सचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण कुमार पाटील, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, उद्योजक रवींद्र लुंकड, युवा उद्योजक संग्राम मुरकुटे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह लुंकड परिवार उपस्थित होता. आर.के.लुंकड हौसिंग फर्म चे संचालक रमणशेठ लुंकड यांचे विशेष सहकार्य या उपक्रमाला लाभले.
अमितेश कुमार म्हणाले, धार्मिकतेसोबत सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन ट्रस्टतर्फे केले जाते, ही कौतुकास्पद बाब आहे. समाजातील गरजवंतांसाठी अशा प्रकारचे कार्य व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले. उत्सवात ५ दिवस अन्नदान सेवा, सकाळी रुद्राभिषेक व रुद्रयाग आणि दुपारी शहर व जिल्ह्यातील भजनी मंडळाची सेवा तसेच ढोल ताशा वादन देखील सुरु आहे. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे या ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन हा उत्सव भाविकांना पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
* दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव
गुरुवार, दिनांक २४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता मंडई बुरुड आळीतील मंदिरात दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी हिंदू धर्मगुरु प.पू. कालीपूत्र कालीचरण महाराज उपस्थित राहणार आहेत. फिरत्या रंगीबेरंगी दिव्यांची व फुलांची आकर्षक आरास यानिमित्ताने होणार असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.