जाधवर इन्स्टिट्यूटमध्ये आग आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिके

पुणे : आग आटोक्यात आणण्यासाठी वाळू, माती, पाणी आणि ओल्या कपड्यांचा वापर कसा करावा… आगीतून स्वत:ची सुटका कशी करावी… याविषयी माहिती देत अग्निशमन दलाच्या प्रमुख अधिका-यांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण आणि त्याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. आग लागल्यावर घाबरुन जाऊ नका अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांना माहिती द्या, असेही यावेळी सांगण्यात आले.
न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात अग्निशमन दलाची प्रात्यक्षिके झाली. यावेळी सबऑफिसर निलेश पोकळे, शशी पवार, लिडिंग फायरमन संजय सकपाळ, फायर इंजिन ड्रायव्हर गणेश ससाणे, फायरमन ॠषिकेश गीते, विशाल धायगुडे, सूरज माने यांनी प्रात्यक्षिके सादर केली. इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला.
अग्निशमन दलाच्या या प्रात्यक्षिकांमध्ये स्वत:ला आणि इतरांना कसे वाचवायचे, आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित करण्याचे मार्ग, काय करावे, करू नये, प्रथमोपचार कसे द्यावेत ही माहिती देण्यात आली. तसेच अग्निशमन उपकरणांच्या वापराबाबत आणि आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात आले.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, आगीच्या घटनांबाबत विद्यार्थी, शिक्षकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी अग्निशामक दलाच्या वतीने प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. अग्निशामक विभागातर्फे असे जनजागृतीपर उपक्रम घेण्यात येत असून हे विद्यार्थी वर्गासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.