ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर
भरपावसात दीड किलोमीटर विजेचा खांब वाहून नेत सुरळीत केला वीजपुरवठा

पुणे, पिकांचे नुकसान टाळत भरपावसामध्ये दीड किलोमीटर अंतरावर विजेचा लोखंडी खांब कामगारांनी वाहून नेत पाच दिवसांपासून खंडित असलेला वीजपुरवठा रविवारी दुपारी सुरळीत केला आहे.
राजगड (वेल्हे) तालुक्यातील वेल्हा बुद्रुक या गावातील ५५ ग्राहकांचा वीजपुरवठा खांब तुटल्यामुळे खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी स्थानिक ग्राहकांसह नेतेमंडळीचा पाठपुरावा सातत्याने सुरू होता. परंतु काम अवघड होते. त्यामुळे मे. अग्रवाल या ठेकेदार एजन्सीची मदत घेण्यात आली. संततधार पाऊस व जोराच्या वाऱ्यामुळे काम करणे अवघड जात होते. मात्र कामगारांनी लोखंडी खांब अंगाखांद्यावर वाहून नेला. तसेच तो उभा करताना भात पिकांचे नुकसान होणार नाही याचीही काळजी घेतली. खांब उभा करून तारा ओढून घेतल्यावर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी महावितरण व ठेकेदार कामगारांचे कौतुक केले.

तसेच महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता युवराज जरग, मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता देविदास बैकर, नसरापूरचे उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ सोनसळे यांनीही वेल्हा शाखा अभियंता सचिन कुलकर्णी, वीज कर्मचारी व ठेकेदार मे. अग्रवाल इलेक्ट्रिकल्स यांचे कौतुक केले आहे.