रावेत उपडाकघर सुरू; नवीन पिन कोड लागू..दिपक भोंडवे

रावेत : रावेतच्या ब्रँच ऑफिसचे उपडाकघरात उन्नतीकरण होताच बँकिंग, आधार अपडेट, बाल आधार, पोस्टल इन्शुरन्स आणि डिजिटल सेवांसह तब्बल १२५ सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध झाल्या. “पोस्ट ऑफिस केवळ पत्र–पार्सलपुरते मर्यादित नसून लाखो बचत खात्यांमुळे डाक विभागावरील विश्वास वाढला आहे,” असे चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले. रावेत चंद्रभागा कॉर्नर येथे शनिवारी (ता. ६) दुपारी साडेबारा वाजता त्यांच्या हस्ते उपडाकघराचे लोकार्पण करण्यात आले.
सन १८८४ पासून कार्यरत पोस्टल इन्शुरन्स उत्तम परतावा देत असल्याचे सांगत आमदार जगताप यांनी नागरिकांना सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे यांच्या पुढाकारातून कार्यालयासाठी जागा उपलब्ध झाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “नवीन कार्यालयामुळे पार्सल, लेटर्स, डीबीटी आणि महिला कर्मचाऱ्यांचे पेमेंट यांसह अनेक स्थानिक अडचणी सुटल्या,” असे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन पिन कोड ४११०८५ लागू झाल्याने रावेत, किवळे व विकासनगर परिसराला थेट व वेळेवर डिलिव्हरी मिळणार असून इंटरनेट–मोबाईल बँकिंग, इन्शुरन्स, पासपोर्ट–लायसन्स–आरसी बुकची घरपोच सुविधाही उपलब्ध होणार आहे.
डाकघर पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक दिलीप सर्जेराव यांनी “देशसेवा–जनसेवा” हे डाक विभागाचे ब्रीदवाक्य सांगत सुकन्या समृद्धी व बचत योजना मोठ्या प्रमाणात वापरण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास दीपकभाऊ सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक भोंडवे, बांधकाम व्यावसायिक नंदू भोंडवे, माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, ऍड. प्रितिसिंह परदेशी, मनोज थोरवे, माधुरी साळवे, सिंधू तंतरपाळे, अलका पांडे, धर्मपाल तंतरपाळे, मेघा पाटील, बाळासाहेब झंझाड, संतोष भोंडवे, सुनील भोंडवे, जया राऊत, अजय भोंडवे, दिलीप राऊत, शैला पाचपुते यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



