ब्रेकिंग न्यूज़मनोरंजनमराठीशहर

‘संगीतसंध्या’ मैफलीत दमदार तबलावादन आणि आश्वासक गायनाचा आविष्कार

‘कलासक्त’ आयोजित ‘संगीतसंध्या’ मैफलीस रसिकांची दाद

Spread the love

पुणे : डॉ. प्रांजल पंडित यांचे दमदार तबलावादन आणि युवा गायिका मृण्मयी भिडे यांचे सुरेल, आश्वासक गायन ही ‘संगीतसंध्या’ मैफलीची वैशिष्ट्ये ठरली. कलासक्त कल्चरल फाऊंडेशन आणि आय. एम. ए. आर्ट्स सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संगीतसंध्या’ या मैफिलीत गायन-वादनाचा बहारदार कलाविष्कार रसिकांनी अनुभवला. डॉ. के. एच. संचेती सभागृह, टिळक रोड येथे ही मैफल रंगली. कलासक्त फाऊंडेशनचे श्रीरंग कुलकर्णी, आय. एम. ए.चे डॉ. रणजीत घाटगे, डॉ. मोहन जोशी, डॉ. दाक्षायणी पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीरंग कुलकर्णी यांनी कलासक्त कल्चरल फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. प्रामुख्याने तरुण कलाकारांना वाव मिळावा, त्यांची कला रसिकांसमोर यावी या उद्देशाने कलासक्त फाऊंडेशन कार्यरत आहे. फाऊंडेशनतर्फे शास्त्रीय गायन स्पर्धा घेण्यात येते. आगामी काळात वाद्यवादन स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘संगीतसंध्या’ मैफलीची सुरुवात डॉ. प्रांजल पंडित यांच्या तबलावादनाने झाली. पंडित आनंद सिधये यांचे शिष्य असलेल्या डॉ. प्रांजल पंडित यांनी ताल त्रिताल सादर केला. पेशकार, कायदा, गत असे सादरीकरण उत्तरोत्तर रंगत गेले. त्यांना मानस साखर्पेकर यांनी लेहरासाथ केली.

उत्तरार्धात मृण्मयी भिडे यांनी राग रागेश्रीमथील ‘प्रथम सूर साधे’ या विलंबित एकतालातील पारंपरिक बंदिशीने सुरुवात केली. त्यानंतर ‘आवत भावत’ ही द्रुत एकतालातील रचना सादर केली. राग मियामल्हारमधील ‘घन गरजत बरसे’ (एकताल) आणि ‘कहे लाडला’ (द्रुत एकताल) ही रचना पेश करत त्यांनी वातावरण निर्मिती केली. ‘धाडिला राम तिने का वनी’ या नाटकातील ‘घाई नको बाई अशी आले रे बकुळफुला’ हे नाट्यपद, ‘तळमळ दूर करी’ ही रचना तन्मयतेने गाऊन ‘बोला अमृत बोला’ या भैरवीने त्यांनी सांगता केली. त्यांना सारंग जोशी (संवादिनी) आणि चिंतामणी वारणकर (तबला) यांनी अनुरूप साथसंगत केली.

असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील इंगळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. आय. एम. ए. आर्ट सर्कलच्या सचिव डॉ. गीतांजली शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!