रंगावलीतून लोकमान्य आणि लोकशाहीरांना अभिवादन
तब्बल २० बाय २० फूट आकारातील भव्य रंगावली ; जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने आयोजन

पुणे : पत्रकार, लेखक व भारतीय असंतोषाचे जनक अशी ओळख असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि मराठी साहित्य क्रांतीचे उर्जास्त्रोत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भव्य रंगावलीतून अभिवादन करण्यात आले. लोकमान्य आणि लोकशाहीर या महापुरुषांनी भारतासाठी केलेल्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या कार्याला प्रेरणा देणाऱ्या वस्तूंचे रेखाटन देखील रंगावलीमध्ये करण्यात आले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, न-हे तर्फे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही महापुरुषांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू सांगणारी ही रंगावली २० बाय २० फूट आकारामध्ये साकारण्यात आली.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. रंगावलीकार सुनील सोनटक्के आणि वैशाली सोनटक्के यांनी तीन तासांमध्ये ही रंगावली साकारली.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणा-या लोकमान्य टिळकांना आणि फकिरा सारख्या साहित्यकृतीतून लोकजागृती करणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याला मानवंदना देण्यात आली. तसेच या व्यक्तिमत्वांचे स्मरण करुन त्यांच्याप्रमाणे कार्य करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.



