विद्यार्थ्यांना सामाजिक जाण आणि ज्ञान देणेही तितकेच महत्त्वाचे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार आणि विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान

पुणे : भारत हा तरुणांचा देश आहे. या देशातील तरुणांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देणे हे आपल्या सर्वांचे दायित्व आहे. विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअर होतो, शंभर वर्षे टिकणारा पूल बांधतो; परंतु त्या परिसरात राहणाऱ्या लोकांचे प्रश्न मात्र वर्षानुवर्षे तसेच राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवताना सामाजिक जाण आणि ज्ञान देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक-पुणे केंद्राच्या वतीने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ आणि विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण समारंभ वरदश्री सभागृहात आयोजित करण्यात आला होता. मराठी आणि संस्कृत विषयांत पीएच.डी., एम.ए. आणि बी.ए. करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष कुंदनकुमार साठे, कार्यवाह विश्वनाथ भालेराव, शैक्षणिक प्रमुख राजेंद्र देवधर, केंद्रप्रमुख मकरंद माणकीकर, तसेच शिरीष आठल्ये, उल्हास पाठक, मुकुंद जोशी, माधव ताटके, परेश मेहंदळे, अनिल शिदोरे, शारंगधर अभ्यंकर, श्रीनिवास साने, पुरुषोत्तम काशीकर, भालचंद्र खाराईत, नीता पारखी, अनघा जोशी, सुवर्णा रिसबूड, अमित गोखले, प्रसन्न देवभानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सानिया पोतदार, माधवी निबंधे, संजय करंदीकर आणि उमेश गालिंदे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते. श्रीमती सुमेधा सरदेसाई यांच्या माध्यमातून ही रोख पारितोषिके देण्यात आली. त्या गेली पाच वर्षे मराठी आणि संस्कृत विषयांत पीएच.डी., एम.ए. आणि बी.ए. मध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देत आहेत. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भाषेची आवड निर्माण होण्यास मदत झाली असून संस्थेला त्यांच्या कार्याचा अभिमान आहे. हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.
डॉ. पराग काळकर म्हणाले, आज भारतीयांचे आठ तास मोबाईलमध्ये जातात. उर्वरित वेळ आपण कशासाठी वापरतो, याचा विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वेळेतील १ टक्का वेळ वाचनासाठी आणि १ टक्का वेळ आरोग्यासाठी द्यावा. हा वेळ कमी असला तरी छोट्या छोट्या सवयींतूनच मोठे बदल घडतात.
पुरस्काराला उत्तर देताना सानिया पोतदार म्हणाल्या, लहानपणापासूनच मला शिक्षक व्हायचे होते. शालेय जीवनातील वय हे आयुष्याला कलाटणी देणारे असते. शाळकरी मुलांना शिकवताना त्यांना व्यक्ती म्हणून घडविणे आणि त्यांच्यावर चांगले संस्कार होणे फार महत्त्वाचे असते. या वयात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, असेही त्यांनी सांगितले.
मकरंद माणकीकर म्हणाले, माणसाच्या जीवनात अनेक घडामोडी घडतात. त्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे शिक्षण. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना दोन गोष्टी अवश्य कराव्यात – एक म्हणजे शुद्धलेखन, आणि दुसरे म्हणजे निरंतर वाचन. या दोन्ही गोष्टींमुळे भाषिक सक्षमता आणि वैचारिक समृद्धी मिळते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा कुलकर्णी यांनी केले. राजेंद्र देवधर यांनी स्वागत केले, विश्वनाथ भालेराव यांनी संस्थेचा परिचय करून दिला, तर सुजाता मवाळ यांनी आभार मानले.