धर्मब्रेकिंग न्यूज़मराठी

वातावरण, चित्तशुद्धीसाठी मंत्रशास्त्राची महती : ह. भ. प. डॉ. चारुदत्त आफळे

विश्वकल्याणाचा व्यापक धर्म प्रत्येकाने पाळावा : ह. भ. प. डॉ. चारुदत्त आफळे

Spread the love

श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम्‌‍, दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्‌‍, शृंगेरी आणि वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे आयोजित वैदिक संमेलनाला पुण्यात सुरुवात

पुणे : पर्यावरणातील सज्जनतेचे रक्षण करणे हे कार्य महनीय आहे. वातावरण शुद्धी होऊन पुढे चित्तशुद्धी व्हावी या करिता मंत्रशास्त्राची महती आहे. हे संमेलन म्हणजे देवकाज करणाऱ्या भक्तांचे संमेलन आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. डॉ. चारुदत्त आफळे यांनी काढले.

श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम्‌‍, दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्‌‍, शृंगेरी आणि वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वैदिक संमेलनाचे उद्घाटन आज (दि. 1) ह. भ. प. डॉ. चारुदत्त आफळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित कीर्तन सेवेत त्यांनी ब्रह्मवृंदाशी संवाद साधला.

OLYMPUS DIGITAL CAMERA

वैदिक संमेलनाच्या उद्घाटन संमारंभप्रसंगी श्री शृंगेरी शारदा पिठाचे महाराष्ट्र प्रतिनिधी वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेचे कार्याध्यक्ष भगवंत ठिपसे, कार्यवाह श्रद्धा परांजपे, वेदमूर्ती स्वानंद धायगुडे, वेदमूर्ती अंशुमान अभ्यंकर, वेदमूर्ती कृष्णशास्त्री पळसकर, वेदमूर्ती विठ्ठल जोशी मंचावर होते. संमेलन पायगुडे बाग, शिवशंकर सभागृह, महर्षिनगर, पुणे 37 येथे आयोजित करण्यात आले असून संमेलनाचा समारोप दि. 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. या संमेलनासाठी महाराष्ट्रासह गोवा येथून ब्रह्मवृंद मोठ्या संख्येने उपस्थित आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेले 17वे वैदिक संमेलन आहे.

संमेलन आयोजनाविषयी प्रास्ताविकात माहिती देताना वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले म्हणाले, वेद हे परमेश्वराचे श्वास आहेत, त्यांचे जतन करण्याचे कार्य ब्रह्मवृंदाकडून होत आहे, याचे समाधान आहे. परंतु वेदरूपी अक्षरब्रह्म शुद्ध ठेवण्याची जबाबदारी शास्त्री, वेदमूर्ती, घनपाठी यांची आहे.

कीर्तनसेवेची सुरुवात ह. भ. प. चारुदत्त आफळे यांनी समर्थ रामदास स्वामी रचित ‌‘सदा देव काजी झिजे देह ज्याचा‌’ या श्लोकाच्या निरुपणाने केली. दासाची लक्षणे सांगणारा हा श्लोक सेवेपेक्षाही ‌‘काज‌’ किती अवघड आणि महत्त्वाचा आहे हे विशद करतो या विषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. वेदशास्त्र सामान्यांना जमण्यासारखे नसल्याने नामाची महती सांगितली गेली आहे, असे सांगून आफळेबुवा पुढे म्हणाले, विश्वकल्याणाचा व्यापक धर्म प्रत्येकाने पाळावा. कीर्तनाच्या उत्तररंगात आफळेबुवा यांनी श्रीमद्‌‍ आद्य शंकराचार्य यांच्या चरित्राचे सविस्तर कथन केले.

सुरुवातीस वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेचे अध्यक्ष दिवंगत डॉ. दीपक टिळक यांना निर्वाणअष्टकाने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेच्या कार्यवाह श्रद्धा परांजपे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारी मंडळ सदस्य डॉ. ज्योत्स्ना खरे यांनी केले. उद्घाटन समारंभापूर्वी ब्रह्मवृंदांच्या हस्ते वेदग्रंथ आणि वेदमूर्तींच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!