वैद्य विभव येवलेकर यांना यशस्वी युवा वैद्य पुरस्कार जाहीर

कै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार : वैद्य लावगनकर परिवारातर्फे आणि लिडजेन आयुर्वेदिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आयोजन
पुणे : वैद्य लावगनकर परिवारातर्फे आणि लिडजेन आयुर्वेदिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने कै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर स्मृतिप्रीत्यर्थ यशस्वी युवा वैद्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकचे वैद्य विभव येवलेकर यांना यंदाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
दिनांक ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता पटवर्धन बागेतील धन्वंतरी सभागृहात कार्यक्रम होणार आहे. डोंबिवलीचे ज्येष्ठ नामांकित वैद्य महेश ठाकूर हे प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून उपस्थित रहाणार आहेत. त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून या निमित्ताने ‘आयुर्वेदीय औषधी कल्प…संरचना व सिद्धांत’ या विषयावर ते बोलणार आहेत.
आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आयुष्य जगणाऱ्या कै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर यांनी वैद्य परंपरेत स्वतःचा ठसा उमटवला आहे. उत्तम उत्तम वैद्य घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या विचारांचा नंदादीप तेवत ठेवण्यासाठी युवा वैद्य पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. पुरस्काराचे यंदा पाचवे वर्ष आहे.