ब्राह्मण महासंघाच्या संघटनात्मक वाढीसाठी मेळावे, संमेलने आवश्यक : डॉ. गोविंद कुलकर्णी
जिल्हाध्यक्ष केतकी कुलकर्णी यांच्या पुढाकारातून मेळावा, सभासद संमेलनाचे आयोजन

पुणे : ब्राह्मण महासंघाचे कार्य महाराष्ट्रासह देशातील 22 राज्यात सुरू आहे. नव्या काळाची आव्हाने पेलण्यासाठी संघटन मजबूत करणे, सदस्यसंख्या वाढवणे आणि सातत्याने एकत्र येणे आवश्यक आहे. महिला मेळावे, सभासद संमेलनासारखे उपक्रम त्यामुळे स्वागतार्ह आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी रविवारी येथे केले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष केतकी कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या महिला मेळावा व सभासद संमेलनात ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, माजी प्रदेशाध्यक्षा मोहिनी पत्की, जिल्हाध्यक्ष मंदार रेडे आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष केतकी कुलकर्णी हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. लॉ कॉलेज रोडवरील आगाशे शाळेच्या सभागृहात मेळावा आयोजित केला होता. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी केतकी कुलकर्णी यांच्या निवडीची घोषणा या प्रसंगी करण्यात आली.
प्रास्ताविक करताना केतकी कुलकर्णी म्हणाल्या, आपल्या ज्ञातीचा अभिमान बाळगत, एकत्र येणे आणि संघटन वाढवणे, यावर भर देत महिला आघाडीचे काम सुरू आहे. उद्योजकीय वृत्ती वाढीस लागावी, यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
डॉ. गोविंद कुलकर्णी पुढे म्हणाले, “केतकी कुलकर्णी यांच्या समर्थ आणि धडाडीच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा महिला आघाडी उत्तम कार्य करत आहे. लवकरच महासंघाच्या 10 हजार पदाधिकाऱ्यांचा माहिती असणारे बुकलेट प्रकाशित केले जाईल. प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी महासंघाच्या विविध शाखांची व कार्याची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी मनोगत व्यक्त केले.
मोहिनी पत्की म्हणाल्या, ज्ञातीमधील पौरोहित्य करणाऱ्यांना नियमित मानधन मिळावे, तसेच ॲट्रोसिटीचा अधिकार मिळावा, या मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करण्याची आवश्यकता आहे.
आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक या विषयावर मार्गदर्शन करताना यामिनी मठकरी यांनी महिलांचे आर्थिक विषयांतील निर्णयस्वातंत्र्य आणि सूक्ष्म नियोजन, यांची सांगड आवश्यक असल्याचे सांगितले. रेणुका जोशी यांनी महिलांचे आरोग्य हा विषय मांडला.
महासंघासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा स्तरावरील महिला शाखांच्या अध्यक्षांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगते व्यक्त केली. नेहा नाटेकर यांनी शंखवादन केले. सीमा रानडे यांनी सरस्वती वंदना सादर केली. माधवी पानसरे यांनी सूत्रसंचालन केले तर महिला आघाडीच्या सरचिटणीस आकांक्षा देशपांडे यांनी आभार मानले.