गणेशोत्सव काळात विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश जारी

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सव शांततामय वातावरणात पार पाडावा, गणपती विसर्जन मिरवणूका रात्री उशिरापर्यंत चालू असल्याने या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याकरिता तालुका स्तरावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्तीबाबत अपर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी आदेश जारी केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव 27 ऑगस्ट 2025 रोजी सुरुवात होणार असून 6 सप्टेंबर 2025 अनंत चतुदर्शीच्या दिवशी सांगता होणार आहे.जिल्ह्यामध्ये साधारणत: 5 व्या, 7 व्या, आणि 9 व्या दिवशी गणपती विसर्जन होतात. मोठ्या मंडळांचे दहाव्या, अनंत चतुर्शीच्या दिवशी गणपती विसर्जन केले जाते. या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूका मोठ्या प्रमाणात निघतात. तसेच ठिकठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असतात, याबाबीचा विचार करता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता – 2023 च्या कलम 14 नुसार तालुका स्तरावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.