ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

सिंधी समाजाला एकत्र आणण्यासाठी  ‘विश्व सिंधी सेवा संगम (युनायटेड)’चा पुढाकार

बॉबी कर्नानी यांची पत्रकार परिषदेत माहिती; एक ऑगस्टला भव्य सोहळ्याचे आयोजन

Spread the love
पुणे, ता. २६ : पुण्यातील सुमारे ४५ हजार सिंधी बांधवांना एका संघटित व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने ‘विश्व सिंधी सेवा संगम (युनायटेड)’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. शहरभर विभागनिहाय गट आणि मध्यवर्ती कोअर कमिटी स्थापन करून सिंधी समाजाची एकजूट वाढवण्यासह सांस्कृतिक वारशाचे जतन, शिक्षण, सामाजिक कार्य आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार आहे. या संस्थेचे उद्घाटन एक ऑगस्टला होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा बॉबी कर्नानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला प्रकाश कर्नानी, हिमांशू अजवानी, डॉ. डिंपल अजवानी, शाम ठाकूर, कुणाल हेमराजानी, हितेश सुगनानी, अमित मिरपुरी, सतीश अथवानी, करिश्मा अथवानी, सरिता पुरसवानी, राशि नछनानी, जय केसवानी, ईशिता मोटियानी, ऐश्वर्या घाटगे-गुरनानी, सिद्धार्थ शाम थडानी, श्रीदा रहेजा आणि हरीश डोडेजा उपस्थित होते. विश्व सिंधी सेवा संगम ही संस्था गेल्या २७ वर्षांपासून कार्यरत असून, ९२ देशांत संस्थेचे काम सुरु आहे.

बॉबी कर्नानी यांनी सांगितले की, पुण्यात सिंधी समाजाची लोकसंख्या मोठी असली, तरी विविध संस्थांमध्ये केवळ मर्यादित सदस्य सक्रिय असतात. या विखुरलेल्या समाजाला एका व्यासपीठावर आणले, तर शासनाकडील विविध योजना, अनुदाने आणि समाजोपयोगी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविता येतील. तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्तरावरही मोठ्या प्रमाणात काम करता येईल. या उपक्रमांतर्गत शहरातील प्रत्येक भागात स्थानिक समित्या स्थापन करण्यात येणार असून, त्याद्वारे आपापल्या परिसरातील सिंधी कुटुंबांशी संपर्क ठेवला जाईल. या सर्व समित्यांचे समन्वय आणि शहरव्यापी उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी मध्यवर्ती कोअर कमिटी कार्यरत राहणार आहे.

संस्थेतर्फे चेटीचंड, लाल लोई, सिंधी भाषा दिन, सिंधी संमेलन यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, सिंधी भाषा व परंपरा जतन करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. याशिवाय दरवर्षी कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी शहराबाहेरील विशेष सहलीचे आयोजनही करण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक मदत, मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा व नागरी सेवांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल सिंधी मुलींच्या विवाहासाठी मदत तसेच गरजू कुटुंबांना सहाय्य करण्याचाही संस्थेचा मानस आहे, असे डॉ. हिमांशू अजवानी यांनी नमूद केले.

उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सिंधी उद्योजक आणि व्यावसायिकांची माहिती असलेली बिझनेस डिरेक्टरी तयार करण्यात येणार आहे. तसेच उद्योजकांमध्ये परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी नेटवर्किंग कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, समाजोपयोगी व सांस्कृतिक उपक्रमांसाठी प्रायोजकत्व आणि निधी संकलनावरही भर दिला जाणार आहे.

पुण्यातील सर्व सिंधी कुटुंबांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, विभाग समन्वयक म्हणून पुढाकार घ्यावा, युवकांना मार्गदर्शन करावे आणि समाजाच्या संघटन कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले. लवकरच परिचय मेळावा आयोजित करून मध्यवर्ती कोअर कमिटीची स्थापना, विभागाध्यक्षांची नियुक्ती आणि वर्षभराच्या उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!