तब्बल ११ ध्वजपथकांसह ढोल ताशा वादनातून ओंकारेश्वराला मानवंदना
श्री ओंकारेश्वर मंदिर देवस्थान च्यावतीने आयोजन ; आमदार हेमंत रासने यांची उपस्थिती

पुणे : मुठा नदीच्या किनारी उभारलेले, नऊ घुमटांनी सजलेले आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीचे सुंदर दर्शन घडवणाऱ्या पुण्याच्या पेशवेकालीन श्री ओंकारेश्वर मंदिरात तब्बल ११ ध्वजपथकांसह ढोल ताशा वादकांनी महादेवाला मानवंदना दिली. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवार निमित्त ‘श्री ओंकारेश्वर चरणी मानवंदना’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला राज्याचे आमदार हेमंत रासने यांसह मंदिराचे कार्यकारी विश्वस्त धनोत्तम लोणकर, गौरव बापट, विशाल घरत यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानवंदना देण्याकरिता सहभागी ११ पथकांमध्ये रमणबाग, शिवगर्जना, ज्ञानप्रबोधिनी, श्रीराम, स्वरूपवर्धिनी, नादब्रह्म, युवा, अभेद्य, गरवारे, शिवमुद्रा, गजलक्ष्मी या पथकांचा समावेश होता. तसेच समर्थ प्रतिष्ठानचे स्थिरवादन देखील यावेळी झाले.
धनोत्तम लोणकर म्हणाले, ओंकारेश्वर मंदिराचे बांधकाम इ.स. १७३४ ते १७३६ या कालावधीत झाले असून या वास्तूला ऐतिहासिक महत्व आहे. शहराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वैभवाचे हे प्रतीक आहे. त्यामुळे यंदा शेवटच्या श्रावणी सोमवारी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व वादकांच्या उपस्थिती महाआरती करण्यात आली.