गणेश मंडळांच्या वीजजोडणीसाठी महावितरणची ‘एक खिडकी सुविधा’

पुणे,पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीजजोडणी देण्यासाठी महावितरणने रास्तापेठ येथील कार्यालयात ‘एक खिडकी सुविधा’ उपलब्ध केली आहे. सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी केले आहे.
गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणीसाठी महापालिका किंवा स्थानिक स्वराज संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, पोलिस परवानगी, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी अहवाल इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. रास्तापेठ पावर हाऊस येथील मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्रामध्ये पुणे शहरातील सर्व गणेश मंडळांचे अर्ज स्विकारले जाणार आहेत. याकरिता अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश लोखंडे (मो. ७८७५७६७४९४) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, गणेश मंडळांनी या ‘एक खिडकी सुविधे’चा लाभ घ्यावा.
गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा वीज अपघात होऊ नये यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे इ. यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. मंडपातील वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये. तसेच मंडपातील वीजसंच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडून करून घ्यावी. आपात्कालीन स्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या स्थानिक शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत.
तात्पुरत्या वीजजोडणीसाठी गणेश मंडळांना मंजूर वीजभारानुसार अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. ही रक्कम ऑनलाईन भरल्यास गणेशोत्सव संपल्यावर वीजबिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल. त्यामुळे गणेश मंडळांनी अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरावी, असे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.