मराठी

३७व्या पुणे फेस्टिव्हलचे केंद्रीयमंत्री शेखावत यांच्या हस्ते उद्घाटन!

Spread the love

कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, क्रीडा आणि पर्यटनविकास यांचा मनोहारी संगम असणारा ‘पुणे फेस्टिव्हल’ यंदा गौरवशाली ३७वे वर्ष साजरे करीत आहे. यंदा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात ‘पुणे फेस्टिव्हल’ संपन्न होईल. याचे उद्घाटन आज शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिकमंत्री मा. गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होईल. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे अध्यक्षपद भूषवतील. केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, महाराष्ट्राच्या महसूल राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा. सुनेत्रा पवार, खा. मेधा कुलकर्णी, खा. श्रीरंग बारणे, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळाच्या पुणे विभागाच्या उपसंचालिका सौ. शमा पवार हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच अनेक परदेशी पाहुणे व परदेशी विद्यार्थी यांना उद्घाटन सोहळ्यास निमंत्रित करण्यात आले आहे.

पुणे फेस्टिव्हल कमिटी, पुणेकर नागरिक आणि महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. पुणे फेस्टिव्हलचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामुल्य असतात.

३७व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून, पंचशील व सुमा शिल्प हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, एनईसीसी, आयआयएफएल कॅपिटल, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, सुहाना मसाले आणि अहुरा बिल्डर्स हे उपप्रायोजक आहेत.

विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उत्तुंग कामगिरी करणाऱ्या नामवंतांना पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात ‘जीवनगौरव’ पुरस्कार, तसेच ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ देऊन गौरविले जाते. यंदा भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम आणि डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविले जाईल. तसेच अभिनेत्री अमृता खानविलकर, ज्येष्ठ नाट्यलेखक डॉ. सतीश आळेकर, भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, ‘महाराष्ट्र केसरी’ पृथ्वीराज मोहोळ, माउली कृषी पर्यटन केंद्राचे ज्ञानदेव कामठे आणि उद्योजिका सुप्रिया बडवे यांना ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ देऊन सन्मानाने गौरविले जाईल.

सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या पुण्यातील मंडळाचा पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी उद्घाटन सोहळ्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कै. प्रतापराव ऊर्फ तात्या गोडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘जय गणेश पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो. यंदा रास्ता पेठेतील नायडू गणपती मंडळ यांना या पुरस्काराने गौरविले जाईल.

उद्घाटन सोहळा

दरवर्षीप्रमाणे यंदाचा उद्घाटन सोहळादेखील नेत्रदीपक असेल. सुरुवातीला ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर व त्यांचे सहकारी यांच्या सुमधुर सनईने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. दीपप्रज्वलन व श्री गणेश आरती होईल. नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांच्या कलावर्धिनी नृत्यशाळेतर्फे भरतनाट्यम् गणेशवंदना सादर होईल. नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. जानकी ग्रुप ऑफ गरबा अँड फोक संस्थेतर्फे ‘शिवतपस्वींचे नृत्य’ सादर होईल. भैरवी सचदेव यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. सिम्बायोसिस संस्थेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे ‘वसुधैव कुटुंबकम्’ नृत्याविष्कार याचे आयोजन अमृता रुईकर यांनी केले असून रूपाली चौधरी यांनी व्यवस्थापन केले आहे. महाराष्ट्र मंडळाच्या युवा कसरतपटूंनी सादर केलेली मल्लखांब प्रात्यक्षिके हे वेगळे आकर्षण असेल. सिक्कीम भारतात विलीन झाला, त्यास यंदा ५० वर्षे झाल्यानिमित्त ऋतुरंग कल्चरल ग्रुप यांनी आयोजिलेले सिक्कीमचे ‘मरोनी’ लोकनृत्य व आसामचे ‘बिहू’ नृत्य सादर होईल. करुणा पाटील व देविका बोरठाकुर यांनी याचे आयोजन केले आहे. पुण्यातील ईश्वरपुरम संस्थेत शिकणाऱ्या नागालँड व अरुणाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांचा ‘वॉर डान्स ऑफ नागालँड’ आणि ‘फेस्टिव्हल डान्स ऑफ अरुणाचल’ हे नृत्याविष्कार सादर होतील. विनीत कुबेर यांनी याचे आयोजन केले आहे. ‘पुणे मल्याळी फेडरेशन’तर्फे पुण्यातील केरळी कलावंतांचा राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारा ‘मिले सूर मेरा-तुम्हारा’ हा नृत्याविष्कार सादर होईल. याचे आयोजन फेडरेशनचे अध्यक्ष राजन नायर यांनी केले आहे. आदिवासी संचालनालयाच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे ‘तारपा’ हे आदिवासी लोकनृत्य सादर होईल. पुष्पलता मडावी यांनी याचे आयोजन केले आहे. कथ्थक व लावणी यांची जुगलबंदी पायालवृंद डान्स अॅकॅडमीतर्फे सादर होईल. याचे नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले आहे. ही सारी उद्घाटन सोहळ्याची सांस्कृतिक वैशिष्ट्ये असतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!