
तमाम भारतीयांची मान जगामध्ये अभिमानाने उंचावणाऱ्या ऑपरेशन सिंदूर चा देखावा घरातील गणपतीसाठी साकारून पर्वती येथील या चिमुकलीने पुणेकर गणेश भक्तांसमोर स्तुत्य आदर्श निर्माण केला आहे.
पर्वती लक्ष्मीनगर येथील इयत्ता १२ वी मध्ये शिकणारी संस्कृती मदन सावंत हिने साकारलेल्या देखाव्याला पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी भेट देऊन कौतुक केले आणि गणपतीची आरती केली.
ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी झालेल्या भारताच्या शौर्य कन्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या आमच्या आदर्श आहेत आणि आम्ही पण त्यांच्यासारखेच बनण्याचा प्रयत्न करू असे मनोगत संस्कृती हिने याप्रसंगी व्यक्त केले.
या परिसरातील प्रतिकूल आर्थिक सामाजिक परिस्थितीतील विद्यार्थिनीं चे शैक्षणिक पालकत्व घेतलेल्या जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ ज्योती ढमाळ यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
ही फक्त गणपतीची सजावट नसून प्रत्येक विद्यार्थ्यांनी देश प्रेम हे स्वतःच्या कृतीतून दाखवून देण्याची गोष्ट आहे असा संदेश देणाऱ्या या मुलीचा अभिमान, कौतुक वाटते अशा विद्यार्थ्यांची आज समाजाला आणि देशाला गरज आहे असे प्रतिपादन याप्रसंगी पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार गायकवाड यांनी केले.