ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

औद्योगिक जगतात ऑटोमेशन, डेटा संकलन महत्वाचे – रंगा गुंटी

पीसीसीओई येथे 'आयसीसीयुबीईए - २५', 'आयमेस - २५' आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप 

Spread the love

पिंपरी. विकसित तंत्रज्ञानामुळे औद्योगिक जगतात ऑटोमेशन डेटा संकलन, कृत्रिम बुद्धिमत्तेची उपयुक्तता वाढली आहे. उद्योगांची गरज ओळखून शैक्षणिक संस्था, विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान शिक्षणावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन टाटा मोटर्सच्या क्षमतावर्धन विभागाचे प्रमुख रंगा श्रीनिवास गुंटी यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे आयोजित केलेल्या नवव्या ‘आयसीसीयुबीईए-२५’ आणि चौथ्या ‘आयमेस २५’ आतंरराष्ट्रीय परिषदेचा समारोप नुकताच झाला. यावेळी पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, संयोजक डॉ. जयश्री कट्टी, डॉ. नरेंद्र देवरे आदी उपस्थित होते.

पहिल्या दिवशीच्या सत्रात डॉ. तपन गांधी यांनी ‘संवेदनशील एआय, नवोपक्रमासाठी नैसर्गिक स्वायत्त प्रणाली’ या विषयावर तर दुसऱ्या सत्रात शिरीष कुलकर्णी यांनी ‘एआय – चलित जगासाठी डेटाचा वापर करण्याचे नमुने’ या विषयावर मार्गदर्शन केले. आयआयटी इंदोरचे डॉ. शैलेश कुंडलवाल यांनी ‘प्रगत अभियांत्रिकी साहित्याच्या उपचारात मल्टीस्केल मॉडेलिंगची भूमिका आणि महत्त्व’ या विषयावर तर रिअर ऍडमिरल आशिष कुलकर्णी यांनी ‘जहाज बांधणी कार्यक्रमात शाश्वतता’ ह्या विषयावर मार्गदर्शन केले.

परिषदेचे उद्घाटन सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स पॅकेजिंग नवनिर्मितीचे जनक प्रा. राव तुम्माला, आयईईईचे डॉ. अमर बुचडे यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेसाठी विविध देशांमधून १२४० प्रवेशिका आल्या. त्यामधून २१४ शोध निबंधांचे सादरीकरण केले, असे डॉ. जयश्री कट्टी यांनी सांगितले. ‘आयमेस’ साठी २६० प्रवेशिकां मधून १२० शोध निबंध सादर करण्यात आले, असे डॉ. नरेंद्र देवरे यांनी सांगितले.

संशोधक सुमित कुंभार म्हणाले, परिषदेत नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. तसेच तज्ज्ञांशी संवाद साधत शंकांचे निरसन करता आले.

डॉ. स्वाती जगताप, डॉ. शैलेंद्र बन्ने यांनी परिषदेचा आढावा घेतला. विशेष उपक्रम म्हणून स्वीकारलेल्या शोध निबंधांचे प्रतीक म्हणून ३३४ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

समारोपप्रसंगी संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी पुढील परिषदेचे संयोजक म्हणून डॉ. सोनाली पाटील (आयसीसीयुबीईए – २०२६) आणि डॉ. उमेश पोतदार (आयमेस – २०२६) यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले. डॉ. नरेंद्र देवरे यांनी आभार मानले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!