धर्मब्रेकिंग न्यूज़मराठीशहर
भक्तिमय वातावरणात ‘सूर्यदत्त’ परिवाराच्या बाप्पाचे विसर्जन
सूर्यदत्त परिवारातर्फे गणेशोत्सवाची भव्य-दिव्य सांगता; २७ वर्षांची अखंड परंपरा कायम

गणेशोत्सव भक्ती, उत्साह व संस्कारांचा संगम: प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
भक्तिमय वातावरणात सूर्यदत्त परिवाराने दिला बाप्पाला निरोप; २७ वर्षांची अखंड परंपरा कायम
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची भावना; भक्तिमय वातावरणात सूर्यदत्त परिवाराने दिला बाप्पाला निरोप
पुणे: परंपरेला साजेशी सजावट केलेला मांडव, त्यात विराजमान झालेले सर्वांगसुंदर बाप्पा, कलात्मक रांगोळ्या, मधुर भजने व आरत्या, श्रद्धा व आध्यात्मिक भावाने झालेली पूजा, अशा भक्तिमय वातावरणात सूर्यदत्त परिवारात गणेशोत्सव साजरा झाला. अखंड २७ वर्षांची ही परंपरा जपत वाजतगाजत मिरवणूक काढून सूर्यदत्त परिवाराने आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत विसर्जन केले. ढोल-ताशांचा नाद, झांजांचा गजर आणि लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांनी वादन सादर केले. त्या तालबद्ध लयींनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. बाप्पाला निरोप देताना सर्वांच्या डोळ्यांत भावनांचे अश्रू तरळले. तरीही श्रद्धेने आणि उत्कटतेने सर्वांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ अशी एकच हाक दिली.

सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनमध्ये गणेश चतुर्थीच्या मंगलमय स्थापनेने प्रारंभ झालेला गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. दररोजच्या आरत्या, अथर्वशीर्ष पठण, सामूहिक भजन-कीर्तनांमुळे संपूर्ण परिसर पवित्र झाला. सकाळच्या शांत भक्तिभावापासून ते संध्याकाळच्या महाआरतीच्या गजरापर्यंत बाप्पाच्या चरणी अर्पण केलेल्या प्रत्येक क्षणाने उपस्थितांना आध्यात्मिक उर्जा आणि आनंद दिला. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापनातील सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भक्तिभाव, आनंद आणि एकतेचा संदेश देत सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा केला. गेली २७ वर्षे अखंडपणे चालत आलेली ही परंपरा यावर्षीदेखील तेवढ्याच श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने पार पडली.
प्रसंगी ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्त परिवाराने गणेशोत्सवाचा खरा अर्थ अनुभवला. भक्ती, एकता आणि संस्काराची शिकवण देणारा हा उत्सव आहे. सूर्यदत्तमध्ये गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर विद्यार्थ्यांसाठी मूल्यांचा, संस्कारांचा आणि सांस्कृतिक वारशाचा जिवंत धडा आहे, असे आम्ही मानतो. सूर्यदत्त परिवारात केवळ शिक्षण आणि करिअर विकास नव्हे, तर भारतीय संस्कृतीचे जतन, परंपरांचा सन्मान आणि समाजोपयोगी कार्य यांनाही तेवढेच महत्त्व आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने आम्ही नेहमीच समाजोपयोगी कार्यासाठी तत्पर राहू.”
‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल यांनीही विद्यार्थ्यांना उत्साह, श्रद्धा आणि समाजोपयोगी उपक्रमांत सक्रिय राहण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विसर्जन मिरवणुकीवेळी सहाय्यक उपाध्यक्ष सिद्धांत चोरडिया, नयना गोडांबे, रोशनी जैन, स्वप्नाली कोगजे, शीतल फडके, केतकी बापट, डॉ. सीमी रेठरेकर, डॉ. मनीषा कुंभार, डॉ. श्रीकांत जगताप, डॉ. प्रतिक्षा वाबळे, डॉ. मोनिका सेहरावत यांच्यासह संपूर्ण सूर्यदत्त परिवार उत्साहाने सहभागी झाला.