
सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रफुल्ल मानकर याने केलेल्या नाबाद ७८ धावांच्या खेळीच्या जोरावर गट्स अँड ग्लोरी संघाने स्पार्टन क्रिकेट क्लबचा २ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पार्टन क्रिकेट क्लब संघाने २० षटकामध्ये १६८ धावांचे लक्ष्य उभे केले. पहिल्या दहा षटकांमध्ये चांगली सुरूवात करताना स्पार्टन क्लबने १०४ धावा जमविल्या होत्या. अभिषेक परांगे (३९ धावा) आणि अमित देशपांडे (३६ धावा) यांनी संघाला सुरूवात करून दिली होती. त्यानंतर गट्स अँड ग्लोरीच्या गोलंदाजांनी स्पाटर्नच्या फलंदाजीला वेसण घातली. गौरव धनवटे याने चार तर, रितेश साळी आणि संजय इनामदार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना गट्स अँड ग्लोरीच्या डावाची सुरूवात चांगली झाली नाही. पहिल्या पॉवर प्लेमध्येच त्यांनी सलामीच्या जोडीला गमावले होते. आठ षटकानंतर ५८ धावांवर ६ गडी बाद असा त्यांचा संघ अडचणीमध्ये सापडला होता. त्यानंतर प्रफुल्ल मानकर याने ४४ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ७८ धावांची खेळी केली. प्रफुल्ल याने हृषीकेश आगाशे (३४ धावा) आणि शुभम हरणे (२३ धावा) यांना साथीला देत शेवटच्या षटकांमध्ये संघाला विजयी रेखा पार करून दिली.
फर्ष अन्सारी याने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर मास्टर्स क्लबने ब्रेव्हहार्ट क्लबचा २७ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळणाऱ्या मास्टर्स क्लबने १७.४ षटकात १७० धावांचे लक्ष्य उभे केले. अमित गणपुळे (३९ धावा), गिरीष कोंडे (२३ धावा), नीरज आठवले (२२ धावा) आणि फर्श अन्सारी (२२ धावा) यांनी संघाचा डाव बांधला. नीरज शर्मा याने ५२ धावांमध्ये पाच गडी बाद केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबचा डाव १४३ धावांवर संपुष्टात आला. जय कुमार (३५ धावा) आणि विश्वास कुंभार (२५ धावा) यांनी संघाकडून प्रतिकार केला. मास्टर्सच्या फर्श अन्सारी याने १७ धावांत ३ गडी बाद केले. नितेश जोशी आणि नचिकेत कुलकर्णी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाचा विजय निश्चित केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्यपुर्व फेरीः
स्पार्टन क्रिकेट क्लब पुणेः २० षटकात १० गडी बाद १६८ धावा (अभिषेक परांगे ३९, अमित देशपांडे ३६, गौरव धनवटे ४-२४, रितेश साळी २-२६, संजय इनामदार २-४५) पराभूत वि. गट्स अँड ग्लोरीः १९.५ षटकात ८ गडी बाद १६९ धावा (प्रफुल्ल मानकर नाबाद ७८ (४४, ५ चौकार, ५ षटकार), हृषीकेश आगाशे ३४, शुभम हरणे २३, कौस्तुभ देशपांडे ३-२६, श्रीपाद भागवत २-२२, विवेक कुबेर २-३४); (भागिदारीः सातव्या गड्यासाठी प्रफुल्ल आणि शुभम यांच्यात ८१ (५४); सामनावीरः प्रफुल्ल मानकर;
मास्टर्स क्लबः १७.४ षटकात १० गडी बाद १७० धावा (अमित गणपुळे ३९, गिरीष कोंडे २३, नीरज आठवले २२, फर्श अन्सारी २२, नीरज शर्मा ५-५२) वि.वि. ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबः १७.५ षटकात १० गडी बाद १४३ धावा (जय कुमार ३५, विश्वास कुंभार २५, फर्श अन्सारी ३-१७, नितेश जोशी २-२६, नचिकेत कुलकर्णी २-३१); सामनावीरः फर्ष अन्सारी;