शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार संघटनेच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी डॉ. भारती चव्हाण यांची निवड
महा ऍग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी फेडरेशनच्या कार्यकारी अध्यक्ष पदाचीही जबाबदारी

पिंपरी, पुणे (दि. ११ सप्टेंबर २०२५) मानिनी फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात महिलांचे संघटन उभारलेल्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांची शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार संघटना महासंघच्या ‘राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी’ आणि ‘राष्ट्रीय कार्यकारणी समिती सदस्य’पदी निवड करण्यात आली आहे. तसेच महा ऍग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी फेडरेशनच्या ‘कार्यकारी अध्यक्ष’ पदावरही डॉ. भारती चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे, तसे पत्र संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार आणि राष्ट्रीय सचिव यू. आ. सिद्दिकी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
या दोन्ही संस्था राज्यातील व देशातील शेतकरी उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचा जास्तीत जास्त आर्थिक मोबदला मिळवून देण्याचे काम करतात. तसेच शेतकरी उत्पादकांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडविण्यात पुढाकार घेतात. शेतकऱ्यांना उत्पादन, प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन व विपणन यासाठीही मार्गदर्शन करतात. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा आर्थिक मोबदला जास्त मिळत आहे आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होत आहे. या संस्थेच्या कार्यविस्ताराची जबाबदारी उत्तम संघटन कौशल्य असलेल्या व उच्चशिक्षित डॉ. भारती चव्हाण या पार पाडतील असा विश्वास विठ्ठल राजे पवार यांनी व्यक्त केला आहे.
या तिहेरी जबाबदारी मुळे संघटनेच्या कार्यात नव्या उर्जेने आणि नियोजनबद्धतेने मी सर्वांना बरोबर घेऊन काम करेल असे डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले.