‘साहित्य रंग’ भाग – २७, प्रेक्षकांच्या भेटीला…
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेवर एक दर्जेदार साहित्यिक पर्व

मुंबई,: मिती ग्रुप प्रस्तुत आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या मा. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष पुढाकारातून साहित्य, कविता आणि विचारांची मेजवानी देणारे ‘साहित्य रंग’ या डिजीटल व्यासपीठाचा २७ वा भाग १० ऑक्टोबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम मिती ग्रुप डिजिटलच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित होणार आहे.
साहित्यप्रेमींसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. या भागात लेखिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो आणि कवयित्री मिनाक्षी पाटील आपले लेख, साहित्यिक विचार, कविता आणि रचना सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने या करणार असून, नेहमीप्रमाणे रसिकांशी संवाद साधणारी ही मालिका साहित्यप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
या विशेष भागात सहभागी होत असलेल्या कवयित्री मीनाक्षी पाटील या कवयित्री, चित्रकार आणि ललित लेखिका आहेत. सध्या त्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव म्हणून कार्यरत असून, सौंदर्यशास्त्र विषयात मुंबई विद्यापीठातून सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. त्यांनी कविता, समीक्षा, लोकाभ्यास, अनुवाद अशा विविध क्षेत्रांत विपुल लेखन केले असून, त्यांना पु.भा. भावे पुरस्कार, रुपाली दुधगांवकर राष्ट्रीय साहित्य पुरस्कार, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार यांसारखे अनेक मानाचे सन्मान मिळाले आहेत.
तसेच, प्रा. डॉ. सिसिलिया कार्व्हालो या प्राचार्या व प्रख्यात लेखिका आहेत. त्यांनी कविता, कथा, ललित, बालवाङ्मय आणि लोकसाहित्य या विविध प्रकारच्या लेखनातून मराठी साहित्यात लक्षणीय योगदान दिले आहे. ‘उन्मेष’, ‘अंतर्यामी’, ‘सूर्य किरणात आला’ यांसह अनेक ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले आहेत. त्यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श शिक्षिका पुरस्कारासह राज्य सरकार व विविध साहित्य संस्थांचे २५ हून अधिक पुरस्कार लाभले आहेत.
‘साहित्य रंग’ ही मालिका डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या साहित्यिक जाणिवेचा आणि नव्या लेखक-कवींसाठी उभारलेल्या व्यासपीठाचा उत्तम नमुना आहे.
रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम खालील लिंकवर पाहता येईल –



