मोबाईलचा वापर ‘स्मार्ट’ हवा; अतिरेकाने होताहेत दुष्परिणाम
- प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची माहिती; सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्चच्या सर्वेक्षण

किशोरवयीन विद्यार्थ्यांचा ‘स्मार्ट’ मोबाईल वापराकडे कल असल्याचा
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्चच्या सर्वेक्षणात निष्कर्ष
– प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची पत्रकार परिषदेत माहिती; २१ डिसेंबरला चित्रकला व रंगकाम स्पर्धेचे आयोजन
– सूर्यदत्त नॅशनल स्कुलमध्ये ‘सेव्ह नेशन, सेव्ह वर्ल्ड’ संकल्पनेवर आबालवृद्धांना कॅनव्हासवर रंग भरण्याची संधी
पुणे: किशोरवयीन मुलांमध्ये मोबाईल वापराचे मोठे आकर्षण आहे. एवढेच नाही, तर मुलांमध्ये मोबाईलच्या वापराचे चांगले व वाईट परिणाम याबाबत जागरूकता येत असली, तरी त्याचा मोह सुटत नसल्याचे दिसून येत आहे. मुलांना मोबाईलचा स्मार्ट वापर हवा आहे. त्याचवेळी मोबाईलच्या अतिरेकी वापराने शारीरिक व मानसिक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा ‘मर्यादित व शहाणपणाचा’ वापर वाढत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिक्षण, माहिती व डिजिटल कंटेंटसाठी मोबाईलवर अवलंबित्व वाढत असताना अतिवापरामुळे एकाग्रता कमी होणे, अभ्यासात व्यत्यय येणे याबाबतची चिंता विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे, अशी माहिती सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काही वर्षांपूर्वी शाळेच्या दप्तरात फक्त पुस्तके, वही, पेन्सिल इतकेच असायचे. आज त्या दप्तरात एक अदृश्य वस्तू कायम असते, ती म्हणजे मोबाईल. अभ्यास, मनोरंजन, माहिती, मित्रमैत्रिणींशी संवाद यासंह इतर अनेक गोष्टी एका स्क्रीनवर उपलब्ध झाल्या आहेत. पण या स्क्रीनच्या प्रकाशात विद्यार्थी काय शिकताहेत, काय हरवताहेत? याचे उत्तर शोधण्यासाठी सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्चच्या वतीने शहरातील किशोरवयीन १५ ते १८ वर्षे वयोगटातील २,७०० विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाने अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर आणल्या आहेत. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी माहिती दिली. यावेळी ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलाखा, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य प्रा. अजित शिंदे, सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या प्राचार्या डॉ. अनुपमा नेवरेकर, कलाशिक्षक नेहा पवार, व्यवस्थापिका (पीआर) स्वप्नाली कोकजे आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सुमारे ४० टक्के विद्यार्थी मोबाईलचा वापर योग्य प्रमाणात आणि मर्यादित पद्धतीने केला, तर तो उपयुक्त ठरतो, असे नमूद करतात आणि हे हे डिजिटल परिपक्वतेचे द्योतक आहे. त्याउलट ३३ टक्के विद्यार्थी मोबाईलचा अतिवापर केल्याने वेळ वाया जाणे, एकाग्रता कमी होणे, अभ्यासावर विपरीत परिणाम होणे अशा तक्रारी व्यक्त करतात. तर २० टक्के विद्यार्थी मोबाईलमुळे शिक्षणात मोठी मदत होते, असे म्हणतात. गुगल, युट्युब ट्युटोरियल्स व ऑनलाइन शैक्षणिक साधनांमुळे विषय समजण्यात मदत होते, असेही काहींनी नमूद केले. ७ टक्के विद्यार्थी मोबाईलबाबत तटस्थ असून त्यांना वापर असो वा नसो, फरक पडत नाही.”
——————————–
सूर्यरत्न गुरुकुल सुरु करणार
या निष्कर्षांवरून शाळांनी डिजिटल वेलनेस कार्यक्रम राबविण्याची गरज अधोरेखित करीत यामागे तंत्रज्ञानाला विरोध करण्याचा हेतू नसून, त्याचा सजग व मर्यादित वापर वाढवणे हा आमचा उद्देश असल्याचे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सांगितले. यासाठी कार्यशाळा, समुपदेशन सत्रे व जागरूकता मोहिमा राबविण्यात येणार आहेत. मोबाईल व डिजिटल व्यसनाशी झुंजणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी सूर्यदत्त समूह ‘सूर्यरत्न गुरुकुल’ ही नवी संकल्पना सुरू करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. या उपक्रमांतर्गत तरुणांना समुपदेशन, शिस्तबद्ध दिनक्रम व वर्तन मार्गदर्शन दिले जाणार आहे.
——————————–
सर्वेक्षणात विद्यार्थ्यांसाठी शिफारसी
– दररोजचा ठराविक स्क्रीन-टाइम निश्चित करणे
– अभ्यासाला प्राधान्य देणे
– अनावश्यक स्क्रोलिंग, सोशल मीडिया व मनोरंजनापासून दूर राहणे
– शैक्षणिक ऍप्सचा उद्देशपूर्ण वापर
– डोळ्यांचा ताण टाळण्यासाठी नियमित ब्रेक घेणे
– खेळ, वाचन, प्रत्यक्ष संवाद यांना अधिक वेळ देणे
——————————–
रंगकाम व चित्रकला स्पर्धा
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सूर्यदत्त नॅशनल स्कूलतर्फे २१ डिसेंबर २०२५ रोजी ‘सेव्ह नेशन, सेव्ह वर्ल्ड’ या थीमवर ओपन स्कूल ड्रॉइंग अँड पेंटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वय ४ ते १२ वर्षे व त्यापुढील चार गटांत ही स्पर्धा होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० वाजता शाळेच्या परिसरात होईल. विजेत्यांना एक लाख रुपयांपर्यंतची रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात येतील. नोंदणीसाठी https://forms.gle/EfCHBbta9QDMcmLq7 ही लिंक उपलब्ध असून अधिक माहितीसाठी नेहा पवार (८६०५९५३००८) व सायली पवार (८९७५००३८१०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



