‘लक्ष्य’तर्फे खेळाडूंचा गौरव, जर्सीचे अनावरण

पुणे : विविध क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा लक्ष्य संस्थेच्या वतीने शनिवार (२८ मार्च) पीवायसी हिंदू जिमखाना येथे गौरव केला जाणार आहे. खेळाडूंच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वार्षिक गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यात ‘लक्ष्य’ आणि त्यांच्या भागीदार संस्थांनी पाठबळ दिलेल्या अनेक उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे, याची माहिती शरद कमल, ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, लक्ष्य संस्थेचे सचिव आशिष देसाई, खजिनदार भरत शहा यांच्या उपस्थितीत देण्यात आली. याप्रसंगी याच कार्यक्रमात ‘लक्ष्य’च्या अधिकृत जर्सीचेही अनावरण करण्यात आले.
‘होडेक’ या संस्थेचे सहकार्य लाभलेल्या वैष्णवी आडकरचा डब्ल्यू35 या स्पर्धेतील विजेतेपदाबद्दल गौरव केला जाणार आहे. सुहाना सैनीने इंदूर येथील वरिष्ठ टेबल टेनिस राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करून एकेरीत कांस्य आणि मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले आहे. तिला ‘शेविएट ’चे सहकार्य लाभले आहे. तसेच, आरएसबी ग्रुपचे पाठबळ लाभलेली पॅरा भालाफेकपटू सुचित्रा परिदाने दिल्ली ग्रँड प्रिक्स आणि वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपले वर्चस्व कायम राखले आहे. बॅडमिंटनमध्ये मानसी सिंगने तीन आंतरराष्ट्रीय मालिका जिंकून यंदाचा हंगाम गाजवला आहे. तिला मोर्डे या संस्थेचे सहकार्य लाभत आहे. टेबल टेनिसपटू पृथा वर्टीकर आणि सुहाना सैनीही या वेळी उपस्थित होत्या. बॅडमिंटनपटू तारा शहा हिचाही सन्मान केला जाणार आहे. या सर्वांच्या हस्ते ‘लक्ष्य’च्या नवीन जर्सीचेही अनावरण करण्यात आले.
ग्रँडमास्टर अभिजित कुंटे म्हणाले, ‘सन २०१०मध्ये लक्ष्य या संस्थेची स्थापना करण्यात आली. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी कुठलीही अडचण निर्माण होऊ नये, हा लक्ष्यचा उद्देश होता. आतापर्यंत आम्ही २०० हू अधिक खेळाडूंना पाठबळ दिले आहे. सध्या आम्ही ३५ खेळाडूंना पाठिंबा दिला आहे. हे खेळाडू एकूण ११ क्रीडा प्रकारातील आहेत. त्यांचे शिबिरही आता सुरू आहे.’
या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, ‘लक्ष्य’ने २७ आणि २८ मार्च रोजी खेळाडूंसाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी या शिबिराची आखणी करण्यात आली होती. यामध्ये खेळाडूंची तंदुरुस्ती चाचणी, क्रीडा विज्ञान, दुखापत व्यवस्थापन आणि खेळाडूंच्या विकासावर आधारित सत्रांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वार्षिक गौरव सोहळा. यात ‘लक्ष्य’ आपल्या खेळाडूंच्या कामगिरीचा, त्यांच्या समर्पणाचा आणि प्रगतीचा गौरव करण्याचा निर्धार केला आहे. संस्थेची क्रीडा क्षेत्रातील ओळख अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
….
आधी खेळाडू आता मेन्टॉर
शरद कमल म्हणाला, ‘२०१६पर्यंत मला कुठलाही प्रायोजक नव्हता. यानंतर लक्ष्यने मला पाठिंबा दिला. त्यामुळे पुढील आणखी काही ऑलिम्पिकमध्ये मी सहभागी होऊ शकलो. पाठिंबा मिळाल्यावर तुम्हाला स्पोर्ट्स सायन्सची खूप मदत होते. म्हणजे तुम्हाला चांगेल फिजिओ मिळतात, तुमचे डाएट बघितले जाते. तुमची दुखापत आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही कसे कणखर राहू शकतात, हेदेखील बघितले जाते. आता मी वेगळ्या भूमिकेत आहे. गुणवान खेळाडूंचा शोध घेणे, त्यांच्या कौशल्याला पैलू पाडणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करणे हे माझे काम असेल. २०३६च्या ऑलिम्पिकचे ध्येय ठेऊन आम्ही कामाला लागलो आहोत.’ या वेळी पृथा वर्टीकर, तारा शहा, सुहाना सैनी, स्वस्तिका घोष, सुचित्रा परिदा या खेळाडूंनीही लक्ष्यचे आभार मानले.



