मराठीशहर

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला २० मेपासून प्रारंभ

प्रवेश प्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाचे कालबद्ध नियोजन : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील  

Spread the love

मुंबई, दि. १५ : दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता प्रवेश प्रक्रिया दिनांक २० मे २०२६ पासून सुरू होत आहे. ही प्रवेश प्रक्रिया वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.

  मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर नेणाऱ्या विविध विद्याशाखांमध्ये तंत्र शिक्षण ही अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमधून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञ, अभियंता तसेच उद्योजक होण्याची संधी उपलब्ध होते. दहावीनंतर तीन वर्षांच्या कालावधीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडविण्याबरोबरच रोजगार व उद्योग क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध होतात. पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमधूनच रु. 1 लाख प्रति महिना पगाराच्या नोक-या औद्योगिक क्षेत्राकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.

तंत्रशिक्षण संचालकांच्या मार्गदर्शनाने, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून पदविका अभ्यासक्रमासाठी NEP 2020 अनुरूप अद्यावत ‘K Scheme’ अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात आलेला असून त्याची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

* Outcome-based, Credit System (६ सत्रे, एकूण १२० क्रेडिट्स)

* इंग्रजी व मराठी द्विभाषिक शिक्षण व परीक्षा पर्याय

* विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व कौशल्य विकासासाठी Soft Skills, Social & Life Skills, Yoga, Entrepreneurship, Indian Knowledge System, Essence of Indian Constitution, Environment & Sustainability, Management, Entrepreneurship & Startup, Seminar इ. विषयांचा अंतर्भाव

* IoT, Robotics, Drone Technology, Python Programming, ५G, Cloud Computing, Data Analytics, Cold Chain Management, EV technology, Machine Learning, AI, Green Building, Energy Conservations, UI/UX Designing इ. उदयोन्मुख तंत्रज्ञानांवर आधारित विषयांचा कौशल्य वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून अभ्यासक्रमात समावेश

* औद्योगिक प्रशिक्षण ६ आठवड्यांवरून वाढवून १२ आठवडे

* NCrF नुसार NAD (National Academic Depository) च्या Academic Bank of Credits (ABC) मध्ये विद्यार्थ्यांचे credits जमा करण्यात येतात.

* विद्यार्थ्यांमध्ये Technical skills रुजविण्याकरिता प्रत्येक सत्रात Micro Projects आणि अंतिम सत्रात Capstone Project चा अंतर्भाव

तसेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास करण्याच्या दष्टीकोनातून 9 Centres of Excellence (Robotics, IoT, 3D Printing), 41 Multipurpose Computer Centres व 5 E-Yantra Labs ची स्थापना करण्यात आलेली आहे.

तंत्रशिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अद्यावत अभ्यासक्रम व विविध उपक्रमांमुळे शैक्षणिक वर्ष 20२२-२३ मध्ये 80 टक्के असलेली पदविका अभ्यासक्रमांच्या एकुण प्रवेशित विद्यार्थ्यांची टक्केवारी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये 95 टक्के एवढी झालेली आहे.

पदविका प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा संपूर्ण तपशील तसेच प्रवेशासंबंधी आवश्यक माहिती मिळविण्यासाठी, नावनोंदणी व अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण संचालनालयाच्या https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!