ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

वा रं पठ्ठ्या… आई-वडलांचं नाव काढलंस! पुत्रं असावा ऐसा… ज्याचा तिन्ही लोकी झेंडा- ना. चंद्रकांतदादा पाटील

सुवर्णपदक विजेत्या सनी फुलमाळीचे ना. चंद्रकातदादा पाटील यांच्याकडून पालकत्व

Spread the love

लोकसहभागातून घर आणि शिक्षणासह स्वतःच्या पगारातून दरमहा ५० हजार देण्याची घोषणा

पुणे- 9 नोव्हेंबर – घरची परिस्थिती बिकट असूनही जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर बहरिन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्णपदक कमावणाऱ्या सनी फुलमाळीचं आयुष्यच पालटलं आहे. लोहगाव मधील पालावर राहून कुस्तीमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या सनी फुलमाळीचे पालकत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतले आहे. लोकसहभागातून घर आणि सरावासाठी तालीम, शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत आणि स्वतःच्या पगारातून दरमहा ५० हजार देण्याची घोषणा ना. पाटील यांनी केली.

ना. पाटील यांनी सुवर्ण पदक विजेत्या सनी फुलमाळी आणि त्याच्या कुटुंबाची लोहगाव मधील पालावर जाऊन भेट घेत अभिनंदन करुन त्याच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केलं. यावेळी सनीचे प्रशिक्षक वस्ताद सदाशिव राखपसरे, भाजपा क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे, माजी नगरसेवक बॅाबी टिंगरे यांच्यासह भागातील नागरिक आणि पालावरील बांधव उपस्थित होते.

सनीच्या कामगिरीचे कौतुक करताना ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या बळावर सनीने मिळवलेले यश हे अतिशय कौतुकास्पद आहे. आज त्याने आपल्या कामगिरीने आई-वडिलांचं नाव काढलं आहे. डोक्यावर छप्पर नसतानाही पालावर राहून त्याने ही कामगिरी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, सनीला लोकसहभागातून घर आणि कुस्तीच्या सर्वांसाठी तालीम बांधून देणार आहे. त्यासोबतच शिक्षणासाठी ही सर्वतोपरी मदत करणार असून, माझ्या आणि पत्नीच्या उत्पन्नातून उदरनिर्वाहासाठी दरमहा ५० हजार रुपये देणार असल्याची घोषणा ना. पाटील यांनी यावेळी केली. तसेच, त्याने आपले शिक्षण पूर्ण करण्यासोबतच कुस्तीकडे लक्ष केंद्रित करावे. आणि ॲालिम्पिक मध्येही सुवर्ण कामगिरी करावी, अशी इच्छा व्यक्त केली.

भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश संघटनेचे स्वामी धनगर, शरद माकर, किशोर शिंदे, अरविंद देवकर यांनी या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधल्यामुळे सनी फुलमाळीचे कर्तुत्व आज सर्वांसमोर आलं आहे. त्याबद्दल भटके विमुक्त विकास परिषदेचे आभार मानतो व अशा सगळ्या विषयांमध्ये आम्ही संघटनेला सर्व प्रकारची मदत करू असे उद्गार ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले.

  चौकट

१७ वर्षाखालील खेळाडुंनाही शासकीय नोकरीसाठी पाठपुरावा करणार- ना. पाटील

आंतरराष्ट्रीय तथा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मा. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात यापूर्वीच निर्णय झालेला असून, राज्यभरातील असंख्य खेळाडुंना त्याचा लाभ झालेला आहे. मात्र सदर निर्णय हा १७ वर्षांवरील खेळाडूंना लागू आहे. त्यामुळे सनीच्या निमित्ताने १७ वर्षा खालील खेळाडुंनाही प्रोत्साहन मिळावे, यासाठी मा. मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!