डॉ. आंबेडकरांच्या तत्वज्ञानाला आत्मसात करणे हे बाबासाहेबांचे खरे स्मरण _प्रा.डॉ. दत्तात्रय गायकवाड
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स तर्फे ५ वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन

पुणे . आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचायला हवे, त्यांच्यावर मनन, चिंतन, लेखन आणि संशोधन करायला हवे. डॉ. आंबेडकरांचे खरे स्मरण म्हणजे त्यांच्या तत्त्वज्ञानाला आत्मसात करणे, त्यांच्या विचारांचा खोल अभ्यास करणे, असे मत प्रा.डाॅ. दत्तात्रय गायकवाड यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स तर्फे ५ वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. गायकवाड बोलत होते. व्याख्यानमालेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दूल जाधवर यांनी केले आहे.
प्रा.डॉ. दत्तात्रय गायकवाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान हे केवळ घोषणांच्या देण्यापुरते नको, तर कृतीतून प्रकट झाले पाहिजे. बाबासाहेबांची जयंती म्हणजे बाबासाहेबांचा फोटो डोक्यावर घेऊन नाचण्याचा दिवस नाही.
ते पुढे म्हणाले, जर आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ खऱ्या अर्थाने गतिमान करायची असेल, तर आत्मगौरवाचे मुखवटे उतरवून, अहंकारातून बाहेर पडणे गरजेचे आहे. ही चळवळ केवळ आपल्यापुरती न ठेवता, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायला हवी, असेही त्यांनी सांगितले.