म्हणती ज्ञानदेव’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध

पुणे :भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘गोल्डन मेमरीज’ प्रस्तुत ‘म्हणती ज्ञानदेव’ या विशेष कार्यक्रमाने २६ जुलै २०२५ रोजी पुण्यातील सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली.संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमात अभिवाचन व संगीताचा सुरेल संगम साधण्यात आला.
संतवाङ्मयातील लोकप्रिय आणि नव्या रचनांची साद घालणाऱ्या या सादरीकरणात लेखक व अभिवाचनकार मयूर भावे यांनी रसिकांना शब्दांच्या माध्यमातून भावविश्वात नेले, तर गायिका चैत्राली अभ्यंकर यांनी आपल्या साजशुद्ध गायनाने कार्यक्रमात रंग भरला.या सादरीकरणामध्ये श्री संत ज्ञानेश्वरांच्या अवघ्या एकविसाव्या वर्षाच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग, त्यांच्या विचारांची सामान्य माणसाच्या जीवनातील स्थान आणि ‘ज्ञानेश्वरी’चे अनन्य साधारण महत्त्व उलगडण्याचा प्रयत्न गोष्टीरूपात करण्यात आला.
ज्ञानदेवांनी सांगितलेला गहन विचार सहज भाषेत रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे कौशल्य या कार्यक्रमात दिसून आले.कार्यक्रमाची सुरुवात “जय जय राम कृष्ण हरी”च्या गजराने झाली आणि “मोगरा फुलला” या भावगीताने स्वरांचे दालन उघडले. त्यानंतर “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी”, “इंद्रायणी काठी”, “पैल तोगे”, “विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले”, मुक्ताबाईंचा अभंग आणि मयूर भावे यांनी लिहिलेल्या कवितेचे संगीतबद्ध सादरीकरण अशा विविध रचना सादर झाल्या. शेवट “पसायदान” या मंगलप्रार्थनेने झाला.संगीत संयोजनाची धुरा मिलिंद गुणे यांनी समर्थपणे सांभाळली, ज्यांना राजेंद्र हसबनीस (तबला), उद्धव कुंभार (तालवाद्य) आणि तुषार दीक्षित (कीबोर्ड) यांची उत्तम साथ लाभली.कार्यक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. ‘म्हणती ज्ञानदेव’मधून संतवाङ्मयाचे मौलिकत्व आधुनिक सादरीकरणातून प्रकट झाले. या कार्यक्रमाचे आयोजन सर्वांसाठी विनामूल्य होते.
भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्र समितीचे सदस्य ग्रुप कॅप्टन सुहास फाटक व त्यांच्या पत्नी सौ. मंगल फाटक यांच्या हस्ते कलाकारांचा ज्ञानेश्वरी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
—–