शिवमणी च्या ‘पुष्पांजली’ ने ‘दगडूशेठ’ संगीत महोत्सवात नादब्रह्मची अनुभूती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ४१ वा वर्धापनपदिन ; बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. प्रशालेच्या प्रांगणात आयोजित महोत्सवाचे उद्घाटन

पुणे : ड्रम, डफ, घुंगरू, शंख यांसह विविध वाद्यांवर नाद उमटवित रसिकांना मंत्रमुग्ध करणारे वादन सादर करताना प्रख्यात ड्रम वादक शिवमणी, रुना रिझवी शिवमणी, पंडित रविचारी व सहका-यांनी ‘पुष्पांजली’ स्वरमैफलीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या संगीत महोत्सवाचा प्रारंभ झाला. पुणेकरांनी हे वाद्यवादन प्रत्यक्ष अनुभवताना नादब्रह्माची अनुभूती घेतली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या प्रांगणात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पदमश्री शिवमणी यांच्या हस्ते झाले.
यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपासिंग गिल, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुष्पांजली कार्यक्रमाचा प्रारंभ गणेश वंदनेने झाला. त्यापूर्वी बहारदार सनई वादनाने मैफलीचा प्रारंभ झाला. यावेळी प्रथम तुला वंदितो, तुज मागतो मी आता, बाप्पा मोरया रे., चिक मोत्याची माळ, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया.. या गीतांचे स्वर सनई या पारंपरिक वाद्यातून रसिकांना ऐकायला मिळाले.
प्रास्ताविकात ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले, चौदा विद्या चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणरायासमोर ही संगीत सेवा रसिकांसाठी अनेक वर्षांपासून उपलब्ध करून दिली जात आहे. यंदा ३ एप्रिल पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील दिग्गज कलाकारांचा कलाविष्कार अनुभविण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत हे कार्यक्रम होणार आहेत. यंदाचा संगीत महोत्सव वैविध्यपूर्ण कलांनी सजलेला असून महोत्सवात वाद्यवादन, शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत, नाट्यपदे व भक्तीगीते, लोकगीते, भारुड, चित्रपटगीतांसह बाबुजी आणि मी, भावसरगम या सुप्रसिद्ध कार्यक्रमांचा समावेश आहे.
रसिकांसाठी वाहने पार्किंग व्यवस्था अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटर समोरील नू.म.वि.प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.