पुणेब्रेकिंग न्यूज़मराठीमहाराष्ट्र
निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांमुळेच पर्यावरणाचा समतोल
डॉ. माधव गाडगीळ यांचे मत; डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे यांना पहिला 'एआयबीडीएफ गोंदण पुरस्कार' प्रदान

पुणे. “निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांमुळे निसर्गाचा विध्वंस होतो, अशी अंधश्रद्धा आपल्याकडे आहे. त्यावर शहरी लोक परिसंवाद घेतात. मात्र, विकासाच्या नावाखाली आपण निसर्गावर प्रचंड बोजा टाकतो आहोत, हे आपण विसरून जातो आणि निसर्गात राहणाऱ्या लोकांना दोष देतो. मात्र, निसर्गाच्या सानिध्यात राहून, त्याच्याशी एकरूप झालेल्या लोकांमुळे निसर्गाचा समतोल राखला जात आहे,” असे मत ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले.
पुण्यातील ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग डिसीज फाऊंडेशनच्या (एआयबीडीएफ) वतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे यांना पहिला ‘एआयबीडीएफ गोंदण पुरस्कार’ डॉ. गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डेक्कन जिमखाना क्लब येथे आयोजित सोहळ्यात निवेदक प्रवीण जोशी यांनी डॉ. आमटे दाम्पत्याची प्रकट मुलाखत घेतली. प्रसंगी माजी भारतीय राजदूत गौतम बंबावाले, ‘एआयबीडीएफ’चे संस्थापक विश्वस्त अशोककुमार सुरतवाला, डॉ. शरद मुतालिक, अनिरुद्ध बंबावाले, ॲड. जयंत हेमाडे, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सुनील वर्तक, उद्योजक नितीनभाई देसाई, निवृत्त प्रशासकीय अधिकारी रमानाथ झा, यशवंत खैरे, अनुज गांधी, गीतांजली घाटे, सविता गोखले, महेश जानी, विष्णू मनोहर, सुहास एकबोटे, विनय मणियार, जयंत गोखले, ऍड. एस. बी, खुरजेकर, निलेश तोष्णीवाल, भूषण पानसे, डॉ. पार्वती पैरायतूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. माधव गाडगीळ म्हणाले, “वाघांची संख्या वाढली आहे. ते पोटासाठी शिकार शोधत असतात. त्यांना माणसे सापडतात. शहरी लोक म्हणतात, जंगली प्राण्यांचे शहरात अतिक्रम होतेय, पण यांनीच निसर्गाच्या आतमध्ये अतिक्रमण केले आहे, त्याचे काय करायचे हा विचार केला पाहिजे. काही हजार वर्षापूर्वी हत्ती, वाघ जंगलात राहत होते. त्यांच्या रहिवासावर सर्वांनीच अतिक्रमण केले आहे. शहरी व गावखेड्यातील, सुशिक्षित व सुस्थितीतील शहरी माणूस आणि निसर्गात राहणारा माणूस यांच्यातील दरी कमी होईल, तेव्हाच या देशात काहीतरी वेगळे घडेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जगणे सुलभ होत असले, तरी आर्थिक विषमता अधिकाधिक गडद होत आहे. मोठमोठ्या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर सर्वानी एकत्रित विचार करण्याची गरज आहे.”
डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, “त्वचेच्या आजाराचे दुःख इतरांना कळत नाही. कुष्ठरोग्यांशी जवळून संबंध आले. सहा रुग्णापासून सहा हजारपर्यंत रुग्ण झाले. हातापायांना बोटे नसलेल्या माणसांनाही बाबांनी स्वाभिमानाने जगायला शिकवले. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. काही लोकांचा विरोध झाला. कुष्ठरोग्यांमुळे आमच्याकडे आलेले पाहुणे पाणीही प्यायला घाबरत. मात्र, बाबांनी हे काम नेटाने पुढे नेले. तेव्हाही काही लोक बाबांच्या बरोबर होते. पु. ल. देशपांडे यांना त्यांचा फार आदर होता. समाज मोठेपण देतो, तेव्हा माणूस मोठा होतो. पण कामातून माणसाचे मोठेपण दिसायला हवे.”
“बाबांच्या आणि ताईंच्या कार्यातून प्रेरणा घेत आम्ही हेमलकसाला गेलो. तरुण वयात आव्हानात्मक काम करण्याची संधी मिळाली. स्वयंप्रेरणेने घेतलेल्या या निर्णयात मंदाकिनी सोबत होती. अभावात आनंद मानून तिने खंबीरपणे साथ दिली. हेमलकसामध्ये काम करताना आरोग्य, शिक्षण यावर भर दिला, त्यातूनच त्यांचा विकास होत गेला. स्थानिक भाषेत अनौपचारिक शाळा सुरू केली. आज हेमलकसा कुटुंब हजार लोकांचे आहे. क्रूर प्राण्यांच्या सहवासात राहूनही जिवंत आहे. त्यामुळे त्यांच्यावर माझा विश्वास आहे. त्यांना त्रास दिला नाही, तर ते काही करत नाही. आपल्या गरजा किती वाढवायच्या आणि कुठे थांबायचे हे समजलेच पाहिजे,” असे डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले.
डॉ. प्रकाश आमटे पुढे म्हणाले, “सामाजिक संस्थांसोबत शासनाची संवेदनशीलता वाढायला हवी. शहरी माणसामध्ये अंधश्रद्धा जास्त आहेत. आदिवासी भागात जागृती करणे अधिक सोपे आहे. दोन्ही संस्कृतीत वेगळेपण आहे. त्या लोकांच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण करायला आम्हाला वेळ लागला; पण त्यांनी एकदा स्वीकारल्यावर सर्व गोष्टी जमून आल्या. लोकांची सेवा करताना देवाचा फार विचार करता कामा नये. बाबांनी तरुणांना घडविण्याचे काम केले. सोमनाथ प्रकल्प उभारला. त्यातून श्रमसंस्कार शिबीर सुरु केले. अनेक तरुण त्यातून तयार झाले. प्रत्येकाने एखाद्याची मदत केली, तरी समाजात बदल घडेल. शिक्षणात मोठी विषमता आहे. मूल्यशिक्षण, पर्यावरण यावर काम व्हायला हवे. कोणत्याही अपेक्षेशिवाय काम करत गेलो, त्यामुळे काहीतरी राहिले असे वाटत नाही. कोणतेही काम करताना लाज वाटू देऊ नका. मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा.”
डॉ. मंदाकिनी आमटे म्हणाल्या, “लोकांचा फार विचार न करता चांगले आयुष्य जगणे हेच तारुण्य आहे. कुष्ठरोग्यांसाठी काम करणार्या बाबांच्या घरात जाणार म्हणल्यावर माझे आईवडील तयार झाले नव्हते. त्यांना धक्का बसला होता. पण एकदा बाबांना भेटा, आनंदवन पहा, असे सांगितल्यावर ते आले आणि पाहिल्यानंतर लग्नाला होकार दिला. आपण करत असलेल्या कामातून मिळणारा आनंद हेच सुखी आयुष्य आहे. या कामाच्या निमित्ताने आम्हाला खूप सुखाने सहजीवन जगता आले. बाबा साधनाताईंना कधी विरोध करायचे नाहीत. नास्तिक असूनही त्यांनी ताईंना साथ दिली. त्याच भावनेने माझा आणि प्रकाश यांचीही वाटचाल सुरु राहिली. आज आयुष्याच्या पंच्याहत्तरीतही आम्ही समाधानाने आयुष्य जगत आहोत. प्राण्यांनाही माणुसकीच्या नात्यानेच सांभाळले, त्यामुळे तेही आमच्यावर विश्वास टाकून एकत्रित कुटुंबाचा भाग बनले.”
डॉ. शरद मुतालिक यांनी ‘एआयबीडीएफ’च्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. ‘त्वचेच्या आजारांबाबत जागृती करून ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग आजारांनी ग्रस्त लोकांना मदत करण्याचे काम फाऊंडेशन करत आहे. अशोककुमार सुरतवाला यांच्या प्रेरणेने दिवंगत जयश्री सुरतवाला यांच्या स्मरणार्थ २०२१ पासून हे काम सुरू आहे. सर्वांसाठी आधुनिक औषधोपचार सुलभ व परवडणारे व्हावेत, यासाठी फाऊंडेशन प्रयत्नशील आहे.” डॉ. सुनील वर्तक यांनी आजाराविषयी, तसेच आजाराची लक्षणे, कारणे व आधुनिक औषधोपचार याविषयी सांगितले.
स्वागत प्रास्ताविकात अशोककुमार सुरतवाला म्हणाले, “या गंभीर आजाराची जागृती वाढावी, फाऊंडेशनचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून या कामात लोकांचा सहभाग वाढावा, या हेतूने गोंदण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले. हा पहिला पुरस्कार निस्पृहपणे महारोगी, आदिवासी विकासासाठी आयुष्य वेचलेल्या आमटे दाम्पत्याला देऊन सन्मानित करणे हा फाऊंडेशनचा गौरव आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन यापुढे आणखी जोमाने काम होईल.”
रोहिणी गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. अनिरुद्ध बंबावाले यांनी आभार मानले. अनन्या जोगळेकर यांच्या सुमधूर आवाजातील प्रार्थनेने सोहळ्याची सुरुवात, तर पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.