गीतेच्या सखोल संशोधनातून साकारलेल्या १६ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा
रामसुख अप्लाईड श्रीमद् भगवद्गीता रिसर्च फाउंडेशनतर्फे भव्य आयोजन

पुणे .श्रीमद् भगवद्गीतेच्या व्यावहारिक आणि आध्यात्मिक पैलूंवर आधारित सखोल संशोधनातून निर्माण झालेल्या १६ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रामसुख अप्लाईड श्रीमद् भगवद्गीता रिसर्च फाउंडेशन या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य समारंभ रविवार, दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक प्रल्हाद नारायणदास राठी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला विश्वस्त निधी राठी, संजय मुद्राळे आदी उपस्थित होते.
प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार उपस्थित राहणार असून, विशेष अतिथी म्हणून गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच, सहप्रार्थी म्हणून प्रा. डॉ. मुकुंद दातार, संजय मुद्राळे, महेश पोहनेरकर, किरण शेलार, अजिंक्य कुलकर्णी, संजय भोसले, डॉ. सुनंदा राठी, डॉ. प्रज्ञा कुलकर्णी, संदीप संघवी, डॉ. आनंद मानधने, विश्वतेज पवार आणि मनोज पोचट हे उपस्थित राहतील.
संशोधनात डॉ. आनंद गजानन करंदीकर (तत्त्वज्ञान), वैष्णवी साने-शुक्ल (एम.ए. संस्कृत आणि कोषशास्त्र), मिताली मिलिंद जोशी (एम.ए. संस्कृत आणि कोषशास्त्र), श्रेया मनोज शहा (एम.ए. संस्कृत आणि कोषशास्त्र), मृणाल उदय देशपांडे (एम.ए. मानसशास्त्र), मृणाल हर्षद दातार (एम.ए. संस्कृत) आणि अश्विनी गणेश जोशी (एम.ए. संस्कृत, बी.एड.) यांसारख्या तज्ज्ञ संशोधकांनी मोलाचे योगदान दिले आहे.
या १६ पुस्तकांमध्ये अन्न सेवा, त्रिगुण, विवेक, बहि:करण, अंत:करण आणि स्व, आसक्ती, चिंता, सवय, स्वभाव, नातेसंबंध आणि पालकत्व, अध्ययनपद्धती, मार्गदर्शक तत्त्वे आणि कर्तव्य, कामना, प्रबोधन, सामाजिक सुधारणा, नेतृत्व, मानसशास्त्र यांसारख्या विविध विषयांचा समावेश आहे. याशिवाय प्रल्हाद राठी यांच्या वैविध्यपूर्ण लेखांचे संकलन असलेले ब्राह्ममुहूर्त हे पुस्तकही प्रकाशित होणार आहे.
प्रेरणास्रोत आणि संशोधनाची पार्श्वभूमी या संपूर्ण प्रकल्पाला प्रेरणा मिळाली ती स्वामी रामसुखदासजी यांनी लिहिलेल्या साधक संजीवनी या श्रीमद् भगवद्गीतेवरील टीका कृतीतून. गीताप्रेस, गोरखपूर यांनी प्रकाशित केलेल्या या ग्रंथाच्या अभ्यासातून फाउंडेशनची स्थापना झाली. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या संशोधनात भगवद्गीतेतील स्वधर्म, नियम, आपोआप, वास्तविक, सिद्धांत, विवेक यांसारख्या ६० हून अधिक संकल्पनांचे विचारमंथन करून ही पुस्तके साकारली गेली आहेत. व्यावहारिक दृष्टिकोन आणि व्यापक प्रभावही पुस्तके समाजातील सर्व वयोगटांसाठी उपयुक्त ठरतील असा दृष्टिकोन ठेवून तयार करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे, वॉरेन बफे, चार्ली मुंगेर आणि मार्कस ओरिलीयस यांचे स्टॉइक तत्त्वज्ञान असे विचार गीतेच्या व्यावहारिकतेसह सुसंगत असल्याने त्यांचाही या पुस्तकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. गीता हा केवळ आध्यात्मिक ग्रंथ नसून, जीवनाला व्यावहारिक मार्गदर्शन करणारा आधारस्तंभ आहे, हा संदेश या संशोधनातून समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न आहे. पुढील उपक्रम संस्थेतर्फे पौर्णिमा टॉक्स ही दर पौर्णिमेला आयोजित होणारी विचारमंच मालिका सुरू असून, लवकरच गीतेवरील एकवर्षीय कोर्स सुरू करण्यात येणार आहे.