
पुणे . जैन सोशल ग्रुप आंतरराष्ट्रीय संस्थेच्या महाराष्ट्र रिजनच्या अध्यक्ष, पदाधिकारी तसेच पुणे झोनच्या समन्वयक समितीचा पदग्रहण समारंभ जय जिनेंद्र प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात पूर्वा शहा यांनी कथक नृत्याद्वारे नवकार महामंत्र तर सुहानी शहा यांनी नृत्याच्या माध्यमातून गणेशवंदना सादर केली. प्रमुख पाहुणे व पदाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातून जैन सोशल ग्रुपचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते. सुरुवातीस ढोल ताशाच्या गजरात महाराष्ट्रीय वेशभूषेत पारंपरिक पद्धतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले.

जैन सोशल ग्रुप्स आंतरराष्ट्रीय फेडेरेशनचे अध्यक्ष बिरेन शहा यांच्या उपस्थितीत दिलीप मेहता (महाराष्ट्र रिजन चेअरमन), सचिन शहा (महाराष्ट्र रिजन सचिव) आणि कार्यकारी मंडळाचे पदग्रहण झाले. पुणे झोनचे समन्वयक सुजस शहा व त्यांच्या सहकाऱ्यांना पद बहाल करण्यात आले.
स्थापनेला ६० वर्षे पूर्ण करत असलेल्या जैन सोशल ग्रुप आंतरराष्ट्रीय संस्थेचे ४७५ ग्रुप्स व १ लाख परिवार सदस्य आहेत. तसेच महाराष्ट्र रिजनचे ९० ग्रुप्स व १५ हजार सदस्य आहेत. या संस्थांद्वारे गोग्रास योजना, एज्युकॉन, जीवदया, रक्तदान अशा विविध कमिट्यांद्वारे मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करण्यात येते.
पदग्रहण समारंभप्रसंगी ललित गांधी (अध्यक्ष, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य), राजेश शाह (अध्यक्ष, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल), ललित शाह (माजी अध्यक्ष, जैन सोशल ग्रुप आंतरराष्ट्रीय फेडरेशन), अचल जैन (अध्यक्ष, सकल जैन संघ, पुणे), मिलिंद फडे, प्रवीण चोरबेले, संदीप भंडारी, फेडरेशनचे पधादिकारी मनीष शहा, अभय नहार, मनीष कोठारी, चिराग चोक्सी, मनीष दोषी, जयेश शहा, विनोद शहा, संदीप शहा, राजेंद्र धोका, मनेष शहा व भारतातील असंख्य जैन सोशल ग्रुपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.



