खेलब्रेकिंग न्यूज़मराठी

‘वॉरीयर्स करंडक’ १५ वर्षाखालील मुलींची आंतरक्लब क्रिकेट दिवस-रात्र स्पर्धा !!

एसएआरके अ‍ॅकॅडमी संघाने पीडीसीए अ‍ॅकॅडमीचा पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला !!

Spread the love

पुणे. वॉरीयर्स स्पोटर्स तर्फे आयोजित ‘वॉरीयर्स करंडक’ १५ वर्षाखालील मुलींच्या आंतरक्लब क्रिकेट दिवस-रात्र स्पर्धेत जान्हवी गायकवाड हिने केलेल्या कामगिरीच्या जोरावर एसएआरके अ‍ॅकॅडमी संघाने पुणे जिल्हा क्रिकेट संघटना (पीडीसीए) अ‍ॅकॅडमीचा ५ गडी राखून पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला.

 

फुरसुंगी येथील वॉरीयर्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत नाणेफेक जिंकून पहिल्यांदा खेळताना पीडीसीए अ‍ॅकॅडमीने ३० षटकामध्ये ५ गडी गमावून १६० धावांचे लक्ष्य उभे केले. सलामीवीर डावखुरी फलंदाज गायत्री हांडे हिने ८० चेंडूत ७ चौकारांसह आणि एका षटकारासह ६९ धावांची खेळी केली. दुसर्‍या बाजुने गायत्रीला सायली शिंदे (नाबाद २४ धावा), स्वरा शेंदुरकर (१६ धावा) आणि वैष्णवी सिंग (१६ धावा) यांनी साथ दिली. वैष्णवी आणि गायत्री यांनी ६९ चेंडूत ५१ धावांची सलामी दिली. त्यानंतर गायत्री हिने स्वरा सोबत ५९ चेंडूत ६४ धावांची भागिदारी करून धावांचा पाया रचला.

 

या लक्ष्याचा पाठलाग करताना एसएआरके अ‍ॅकॅडमीने आपला सलामी फलंदाज झटपट गमावला. परंतु जान्हवी गायकवाड हिने डाव सावरताना ६६ चेंडूत १२ चौकारांसह ७८ धावांची खेळी केली. दुसर्‍या बाजुने सिद्धी घाडगे हिने २५ धावांची खेळी केली. या दोघींनी दुसर्‍या गड्यासाठी १२१ चेंडूत ११६ धावांची भागिदारी केली आणि विजयाचा पाया रचला. या दोघी एका पाठोपाठ बाद झाल्यानंतर आर्या मगरे (नाबाद २१ धावा) आणि आर्या शिंदे (नाबाद ८ धावा) यांनी अधिक पडझड न होऊ देता एसएआरके संघाला २८.१ षटकामध्ये विजयी लक्ष्य गाठून देत उद्घाटनाचा दिवस गाजवला.

 

याआधी स्पर्धेचे उद्घाटन भारतीय महिला क्रिकेटपटू अनुजा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीसीएचे प्रशिक्षक इम्तियाज दाफेदार, डी वाय पाटील महाविद्यालयाचे क्रीडा प्रमुख डॉ. रणजीत कदम, स्पर्धेचे संचालक स्वप्निल मोडक, सहभागी संघातील खेळाडू व प्रशिक्षक उपस्थित होते. अनुजा पाटील हिला नुकताच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडून महिला वरिष्ठ गटातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार मिळाला होता. अनुजाने हिने यावेळी मुलींना आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करताना महत्वाच्या टिपणी दिल्या. क्रिकेटमध्ये मुलींचा सहभाग वाढत असून पुण्यामध्येसुद्धा मुलींचे क्रिकेट क्षेत्र विस्तारत आहे. स्पर्धेचे सामने हे ३५-३५ षटकांचे होणार असल्याने मुलींना एसीए निमंत्रित सामन्यांचा सराव होईल, असे अनुजा पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे स्वागत आर्या घोलप, प्रास्ताविक कृतिका चौधरी आणि आभार आदिती वाघमारे हिने मानले. स्वप्नील मोडक स्पर्धेचे स्वरूप यांनी सांगितले.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

पीडीसीए अ‍ॅकॅडमीः ३० षटकात ५ गडी बाद १६० धावा (गायत्री हांडे ६९ (८०, ७ चौकार, १ षटकार), सायली शिंदे नाबाद २४, स्वरा शेंदुरकर १६, वैष्णवी सिंग १६, श्रीशा वाघ २-२९, सृष्टी भुजबळ १-२२);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी वैष्णवी आणि गायत्री यांच्यात ५१ (६९); दुसर्‍या गड्यासाठी गायत्री आणि स्वरा ६४ (५९) पराभूत वि. एसएआरके अ‍ॅकॅडमीः २८.१ षटकात ५ गडी बाद १६४ धावा (जान्हवी गायकवाड ७८ (६६, १२ चौकार), सिद्धी घाडगे २५, आर्या मगरे नाबाद २१, स्वराली तांबे २-१७, सायली शिंदे २-३४);(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी जान्हवी आणि सिद्धी ११६ (१२१); सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः जान्हवी गायकवाड.

 

फोटो ओळी: स्पर्धेचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे आणि संघाचे कर्णधार. फोटोमध्ये (डावीकडून) जान्हवी गायकवाड, डॉ. रणजीत कदम, स्पर्धेचे संचालक स्वप्निल मोडक, अनुजा पाटील, स्वरा कुंजीर, इम्तियाज दाफेदार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button