महाराष्ट्र शिक्षण या त्रैमासिकाच्या उत्कृष्ट उपक्रमांचे निकाल जाहीर

पुणे.शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशील शिक्षकांचे सन 2024/25 मधील विविध नावीन्यपूर्ण उपक्रम शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त झालेत अशा उत्कृष्ट उपक्रमांची निवड महाराष्ट्र शिक्षण या त्रैमासिकाकडून करण्यात आली आहे. यात राजकिरण चव्हाण यांच्या आम्ही किती भयंकर या उपक्रमाला प्रथम क्रमांक, नंदकुमार सागर यांच्या शालेय प्रवेशोत्सव यास द्वितीय क्रमांक, मीना मिश्रा यांच्या ऍक्टिव्हिटीज फॉर डेव्हलपमेंट इंग्लिश कम्युनिकेशन स्किल या उपक्रमास तृतीय क्रमांक तर विशेष पुरस्कार शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात या विनोद राठोड यांच्या उपक्रमास मिळाला आहे. याशिवाय शशांक हजारिका यांच्या डिजिटल लिटरसी, आशा बोकील यांच्या विज्ञान दिंडी, सचिन बेंडभर यांच्या वाबळेवाडी शाळेचा परिसर परीसस्पर्श, कुंदा बच्छाव यांच्या मुंबई दर्शन सहल, संजय जगताप यांच्या मराठी भाषा संवर्धन या उपक्रमांना देखील उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आली असल्याची माहिती संपादक हर्षा पिसाळ यांनी दिली.
महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांमधील शिक्षणाचे वैविध्यपूर्ण प्रयोग इतर शाळांनाही प्रेरणादायी व्हावेत, महाराष्ट्रातील शिक्षणातील असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम करणाऱ्या शिक्षकांच्या उपक्रमाला प्रसिद्धी देऊन इतर शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी महाराष्ट्र शिक्षण या त्रैमासिकाने सन 2024/25 मधील उत्कृष्ट उपक्रमांची निवड करून त्यांना पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका संपादक सौ. हर्षा बाळकृष्ण पिसाळ यांनी नुकतीच या उत्कृष्ट उपक्रमांची घोषणा केली असून याचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करून उपक्रमशील शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
एकच ध्यास !महाराष्ट्राच्या शिक्षणाचा विकास ! हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र शिक्षण या पाचव्या त्रैमासिकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्राचा शैक्षणिक विकास होण्यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी ,प्रशासकीय अधिकारी वर्ग या सर्वांना जाणवलेल्या अडचणी व त्यावर त्यांनी कशी मात केली या संदर्भातील विविध विषयांवर उपक्रमांचा अभ्यास महाराष्ट्र शिक्षण टीम ने केला व त्यातील काही निवडक उपक्रमांची निवड करून त्यांचे निकाल घोषित केले.
संपादक हर्षा पिसाळ यांनी http;//www.maharashtrashikshan.inया वेबसाईटवर सर्व अंक वाचायला मिळतील असे सांगून लेखन पाठवण्यासाठी 9960544477 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.