ब्रेकिंग न्यूज़मराठीमहाराष्ट्र

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पर्यावरणस्नेहींनी गाठला ५ लाखांचा टप्पा

राज्यात ५ लाखांवर ग्राहकांना ६ कोटींचा आर्थिक फायदा

Spread the love

मुंबई. वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘इमेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेमध्ये ५ लाखांचा टप्पा गाठला आहे. या योजनेत सोमवार (दि. ३०)पर्यंत सहभागी झालेल्या ५ लाख ३ हजार ७९५ वीजग्राहकांना ६ कोटी ४ लाख ५५ हजार रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.

पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी होण्याची ऑनलाइन सुविधा व योजनेची सविस्तर माहिती महावितरणच्या मोबाईल अ‍ॅप व www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये सहभागी व्हावे व पर्यावरणपूरक योजनेत योगदान द्यावे असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी केले आहे.

वार्षिक १२० रूपयांचा फायदा – महावितरणकडून पर्यावरणपूरक ‘गो-ग्रीन’ योजनेतून वीज बिलासाठी छापील कागदाचा वापर कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. कागदी बिलाऐवजी फक्त ‘इमेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांचा वीजबिलामध्ये वार्षिक १२० रुपयांचा आर्थिक फायदा होत आहे. विशेष म्हणजे गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील १२ महिन्यांची म्हणजे १२० रुपयांची सवलत एकरकमी देण्यात येत आहे. पूर्वी ही सवलत प्रत्येकी १० रुपये प्रत्येक बिलामध्ये मिळत होती.

पर्यावरणस्नेही ५ लाख ग्राहकांचा प्रतिसाद – वीजग्राहकांसाठी ऐच्छिक असलेल्या गो-ग्रीन योजनेला राज्यात प्रतिसाद वाढत आहे. या योजनेत आतापर्यंत ५ लाख ३ हजार ७९५ पर्यावरणस्नेही वीजग्राहक सहभागी झाले आहेत. या ग्राहकांना ६ कोटी ४ लाख ५५ हजार ४०० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. यामध्ये (कंसात आर्थिक फायदा रूपयांत) पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक २ लाख १ हजार २३३ (२.४२ कोटी), कोकण- १ लाख १३ हजार २५४ (१.३६ कोटी), उत्तर महाराष्ट्र- ७० हजार २२६ (८४.२७ लाख), विदर्भ- ६३ हजार ७३१ (७६.४७ लाख) तसेच मराठवाड्यामध्ये योजनेत सहभागी ५५ हजार ३५१ वीजग्राहकांना ६६ लाख ४२ हजार रूपयांचा वार्षिक फायदा होत आहे.

गो-ग्रीन योजनेचे फायदे – महावितरणच्या संगणक प्रणालीमध्ये वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संबंधित ग्राहकांना नोंदणीकृत ‘इमेल’वर व मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे दरमहा वीजबिल पाठविण्यात येत आहे. वीजबिलांच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये रकमेचा तत्पर भरणा केल्यास एक टक्के सवलत दिली जाते. त्यासाठीही वीजबिल तात्काळ ऑनलाईनद्वारे भरणे सोयीचे झाले आहे. वीजग्राहकांना इमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येते. यासह महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे असे एकूण १२ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!