छत्रपती शाहू महाराज संवाद आणि संघर्षाचे प्रतिक : डॉ. श्रीपाल सबनीस
छत्रपती शाहूजी महाराज पुरस्काराने डॉ. बाबासाहेब कांबळे यांचा गौरव

डॉ. कांबळे यांचे कार्य सेवा आणि समर्पण भावनेतून : डॉ. श्रीपाल सबनीस
पुणे : ज्ञान आणि संघर्ष सेवेचा सुगंध म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय. त्यांनी सद्गुणांची पेरणी करत उपेक्षित, कष्टकरी, दुर्लक्षित, वंचित बहुजनांसाठी कार्य केले. ते क्रांतिकारक वृत्तीचे तसेच संवाद आणि संघर्षाचे प्रतिक होते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श ठेवून डॉ. बाबासाहेब कांबळे संतांच्या समतेचा समर्पणातून विचार करत कार्य करत आहेत, अशा शब्दात डॉ. सबनीस यांनी त्यांचा गौरव केला.
फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहूजी महाराज पुरस्काराने महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब कांबळे यांचा आज (दि. 2) गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड, माजी नगरसेविका लता राजगुरू, आशा कांबळे, विलास लेले मंचावर होते. पंचशील शाल, संविधान ग्रंथ आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब कांबळे यांचे कार्य संत आणि परिवर्तनाच्या परंपरांची पेरणी करणारे आहे. त्यांचे कार्य फक्त संतत्वापर्यंत पोहोचलेले नसून ते छत्रपती शाहूंच्या कार्यापर्यंत पोहोचले आहे. समाजात वाईट कृती घडत असताना सेवा आणि समर्पण भावाने केलेले कार्य गौरवास्पद आहे.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, रिक्षाचालक, फेरीवाले, गोरगरीबांकरीता डॉ. कांबळे यांनी संघर्ष केला आहे. त्यांच्या संघर्षामुळे अनेकांना न्याय मिळाला आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. बाबासाहेब कांबळे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील ज्या वंचित, बहुजन, कष्टकरी समाजासाठी कार्य केले त्याच समाजासाठीच मी 25 वर्षे अविरतपणे कार्य करत आहे. त्यामुळे माझा हा सन्मान कष्टकऱ्यांना अर्पण करतो. घरात वारकरी परंपरा असल्यामुळे आजोबांनी हरिपाठ हाती देऊन माझ्यावर अध्यात्माचे संस्कार केले. त्यातूनच मीही वारकरी संप्रदायाशी एकनिष्ठ झालो. प्रवचन, कीर्तन करू लागलो. माळकरी असूनही समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो.माता रमामाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी पतीच्या मागे खंबिरपणे उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. पतीच्या कार्याचा अभिमान आहे, असे आशा कांबळे म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले तर मान्यवरांचा सत्कार आणि आभार प्रदर्शन लता राजगुरू यांनी केले. कवी भगवान धेंडे यांनी गायलेल्या संविधान गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.