ब्रेकिंग न्यूज़मराठीमहाराष्ट्रशहर

आता दुकाने नाही शाळाच बंद करेन”; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा

Spread the love

(शशिकांत पाटोळे)
मुंबई : मराठीच्या मुद्द्यावरून निघालेल्या मोर्च्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये पोहोचले आहेत. मीरा रोड येथील मनसे शाखेच्या उद्घाटनानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेला राज ठाकरेंनी संबोधित केले. दुकाने बंद करून किती काळ राहणार आहात, असा सवाल राज ठाकरेंनी मीरा रोड येथील व्यापाऱ्यांना दिला. यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही यावेळी राज ठाकरेंनी निशाणा साधला. इतर शाळांमध्ये आज मराठी सक्तीची केली पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलं.

“कानावर मराठी समजत नसेल तर कानावर बसणारच. विनाकारण काहीतरी काढत असतात. इथल्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. तुमच्या कानाखाली मारली होती का? अजून मारलेली नाही. विषय समजून न घेता कुठल्यातरी राजकीय पक्षाचा दबावाखाली येऊन तुम्ही असे बंद करणार असाल तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीत का. दुकाने बंद करून किती काळ राहणार आहात. आम्ही काहीतरी घेतलं तरच तुमचं दुकान चालणार आहे. महाराष्ट्रामध्ये राहताय शांतपणे राहा. मराठी शिका, आमचं तुमच्याशी काही भांडण नाहीये. पण इथे मस्ती करणार असेल तर महाराष्ट्राचा दणका बसणारच,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

“पहिली ते पाचवी हिंदी भाषा शिकली पाहिजे याच्यावरून हे सर्व सुरू झालं. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणारच. आता राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी करावी. त्या दिवशीच्या मोर्चाच्या धक्क्याने निर्णय मागे घेतला होता. महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न करून बघा, आता दुकाने नाही शाळाच बंद करेल. इतर शाळांमध्ये आज मराठी सक्तीची केली पाहिजे,” असं राज ठाकरे म्हणाले.

“मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी करण्याचा लढा हा काही गुजराती व्यापाऱ्यांचा, नेत्यांचा होता. मी आचार्य अत्रेंचे पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठी पहिले सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितलं. मोरारजी देसाई यांनी गोळीबार करून मराठी माणसांना महाराष्ट्र ठार मारलं होतं. गेली अनेक वर्ष यांचा मुंबईवर डोळा आहे,” असेही राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच असं म्हटलं आहे.  “आमच्यासाठी हा प्रतिष्ठेचा विषय नाही पण एक गोष्ट निश्चित सांगतो, त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात लागू होईलच. ते पहिलीपासून होईल की पाचवीपासून हे समिती ठरवेल मात्र १०० टक्के त्रिभाषा सूत्र आम्ही महाराष्ट्रात लागू करू आणि माझा सगळ्यात जास्त विरोध हा इंग्रजीला पायघड्या घालायचे आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाही. भारतीय भाषांचा विरोध हा मी सहन करणार नाही,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!