लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात दीप अमावस्येनिमित्त पारंपरिक दिव्यांचे पूजन
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या सचिव सोनल पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व आरती

पुणे : समई, निरांजन, पणती, लामणदिवा अशा विविध प्रकारच्या पारंपरिक दिव्यांचे पूजन बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात करण्यात आले. दीप अमावस्येनिमित्त मंदीरात फुलांचे लामणदिवे आणि दीपज्योती नमोस्तुते अशी साकारण्यात आलेली फुलांची आरास पाहण्याकरिता भाविकांनी अलोट गर्दी केली.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट च्या वतीने दीप अमावस्येनिमित्त दीपपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव सोनल पाटील यांच्या हस्ते पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी ट्रस्टचे वतीने अध्यक्ष अॅॅड. शिवराज कदम जहागिरदार व कोषाध्यक्ष युवराज गाडवे यांनी त्यांचा सत्कार केला.
अॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, अंधारातून प्रकाशाकडे आणि निराशेतून सकारात्मकतेकडे नेणारा दीप असतो. त्यामुळे त्याचे पूजन केले जाते. श्रावण महिन्यापासून एक उत्साहाचे, आनंदाचे पर्व सुरु होते, त्याचा श्रीगणेशा या दीपपूजनाने केला जातो. त्यामुळे मंदिरात विविध प्रकारच्या पारंपरिक दिव्यांचे पूजन करण्यात आले. तसेच फुलांची आकर्षक आरास देखील करण्यात आली.
सोनल पाटील म्हणाल्या, न्याय्य हक्कांपासून परिस्थिती अभावी वंचित राहिलेल्या दिन दुर्बल आणि अबलांना कायदेविषयक मार्गदर्शन व मदत देवून त्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य विधी सेवा प्राधिकरण सातत्याने करत आहे. आषाढ अमावस्येचे नकारात्मक चित्र दूर करून सकारात्मक संदेश देणारे ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद आहे.