अतिरुद्र महायज्ञाची ३३ कोटी देवता यागासह पूर्णाहुती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन ; वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह ६५ ब्रह्मवृंदांचे पौरोहित्य

पुणे : केवळ धार्मिक विधी नाही, तर सामूहिक आध्यात्मिक जागरण असलेल्या अतिरुद्र महायज्ञाची ३३ कोटी देवता याग व हर्विद्रव्य वनौषधीसहित श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूर्णाहुती झाली. विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे जगाच्या कल्याणाकरिता व आरोग्यसंपन्न समाजाकरीता प्रार्थना करण्यात आली. वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह एकाच वेळी तब्बल ६५ ब्रह्मवृंद यामध्ये सहभागी झाले होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे अतिरुद्र महायज्ञ मंदिरात करण्यात आला. त्याच्या सांगता प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रासने, संगीता रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ज्योती सूर्यवंशी, मृणालिनी रासने, राजू शेठ सांकला आदी उपस्थित होते. सलग वीस दिवस विविध होम यांसह अभिषेक देखील करण्यात आले. गणपती मंदिरात सभामंडपात भव्य होमकुंड साकारण्यात आले होते. अतिरुद्र महायागाचे हे ५ वे वर्ष होते.
गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मुठा, अष्टविनायक येथील नद्या, ज्योर्तिलिंग नद्या, रामेश्वरम २१ कुंडांचे जल या काळात वापरले गेले. तसेच २१ आयुर्वेदिक औषधी वापर होम-हवनाच्या वेळी करण्यात आले. सर्व नद्यांच्या एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारीत पाण्याचा श्रींना जलाभिषेक करण्यात आला. अतिरुद्र यज्ञ ही केवळ पूजा नसून, एक आध्यात्मिक ऊर्जा प्रक्षेपण आहे.
वेदांनुसार, या यज्ञामुळे व्यक्ती, कुटुंब व जग यांच्यात संतुलन व शुद्धता येते. हा यज्ञ जेथे होतो तेथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मनुष्यातील चेतनापेशी उर्जित होतात आणि कार्यमग्नता वाढते. एक लघुरुद्र म्हणजे ११ ब्रह्मवृंदांनी ११ वेळा रुद्रपठण करणे, असे ११ लघुरुद्र म्हणजे १ महारुद्र आणि ११ महारुद्र म्हणजे १ अतिरुद्र होय. अतिरुद्राच्या या मोठया व्यापकतेमुळे वायुमंडल शुद्धधी होऊन सर्व जीवजंतू दूर होतात व सर्व आजारांपासून मुक्ती मिळते.
अतिरुद्र यज्ञ केवळ एक धार्मिक विधी नसून, एक सामूहिक आध्यात्मिक जागरण आहे. यामुळे संपूर्ण समुदाय, गाव, शहर किंवा राष्ट्र स्तरावर अनेक अद््भूत सकारात्मक बदल घडून येतात. दीर्घकाळचे व मानसिक आजारातून मुक्तता, नकारात्मक ऊर्जा दूर होणे, पर्यावरणातील असंतुलन दूर होते, नैसर्गिक आपत्ती कमी होतात आणि संपूर्ण विश्वात शांती व सद्भावना निर्माण होते, हे अतिरुद्र महायज्ञाचे फायदे आहेत. अतिरुद्र याग व इतर धार्मिक कार्यक्रमांत भाविकांनी मोठया संख्येने सहभाग घेतला होता.