लाडकी बहीण अर्थसत्तेने मोठी करण्याचा प्रयत्न
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ; मंडई म्हसोबा ट्रस्टचे भूषण पुरस्कार प्रदान - अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट

पुणे : प्रत्येक महिलेने जे कष्ट घेतले आहेत, त्याचे श्रेय त्या त्या महिलांना मिळायला हवे. इथे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात आहेत. लाडक्या बहिणींचे मानधन कधीही बंद होणार नाही. ज्यांना मिळाले नाही, त्यांना इतर योजना कशा प्रकारे करता येतील, हे सरकार नक्की बघेल. लाडकी बहीण अर्थसत्तेने मोठी व्हावी, या दृष्टीने आपण प्रयत्न करूया, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट च्यावतीने म्हसोबा उत्सवाचे आयोजन मंडईतील बुरूड आळी येथे करण्यात आले आहे. त्यामध्ये यंदाचे भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार विजय शिवतारे, लेखक शरद तांदळे, आमदार हेमंत रासने, माजी नगरसेवक गणेश बीडकर, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते.
यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार चितळे बंधू चे संचालक संजय चितळे, उद्योग भूषण पुरस्कार आर.डी.डेव्हलपर्सचे संचालक निलेश भिंताडे, कला भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, संगीत भूषण पुरस्कार प्रख्यात गायक श्रीनिवास भीमसेन जोशी, धार्मिक भूषण पुरस्कार श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार प्रसिद्ध पत्रकार व संपादक आनंद अग्रवाल यांना प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,फळांची करंडी, महावस्त्र आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमात सद्गुरु बाळूमामा देवालय आदमापूरच्या कार्याध्यक्ष रागिणी खडके यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आज स्त्रिया घराबाहेर पडायला लागल्या आहेत. सुमारे २५ वर्षांपूर्वी असलेली स्त्री आज बदलली आहे. ती स्वतःबदल जागरूक झाली आहे. भक्तांमध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. आता जास्तीत जास्त महिलांनी समाजकारण व राजकारणात सक्रिय व्हावे. समाज बदलण्यास स्वतः नेतृत्व करण्याचा आत्मविश्वास महिलांनी ठेवा.
विजय शिवतारे म्हणाले, स्त्री ही जग उद्धारणारी आहे. प्रत्येकाने स्वतःची कुंडलिनी जागृत करायला हवी. एक महिला चांगली शिकली, तर घर सुधारते. सर्वानी आपले घर व्यवस्थित ठेवले, शिस्त व संस्कार दिले तर निश्चितपणे समाज श्रीमंत होईल. महिलांनी आपला आत्मविश्वास जागृत करा. लाडकी बहीण योजनेत वर्षाच्या बजेटमधून ४६ हजार कोटी महिलांना दिले जातात. सर्वसामान्य महिलांना मिळणारे १५०० रुपये त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत.
पुरस्काराला उत्तर देताना श्रीनिवास जोशी म्हणाले, मंडईशी लहानपणापासून आठवणी जोडल्या गेल्या आहेत. या भूमीला रसिकतेची, विद्वत्तेची मोठी परंपरा आहे. या परिसराला मंडई विद्यापीठ म्हणायचे, असे सांगत त्यांनी मंडईशी निगडीत आठवणी सांगितल्या. निवृत्ती जाधव यांनी प्रास्ताविक केले.