धर्ममराठीशहर

एक ऑगस्टपासून पुण्यात वैदिक संमेलन

Spread the love

पुणे : श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम्‌‍, दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्‌‍, शृंगेरी आणि वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 ऑगस्ट ते दि. 3 ऑगस्ट या कालावधीत पुण्यात वैदिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संमेलन पायगुडे बाग, शिवशंकर सभागृह, महर्षिनगर, पुणे 37 येथे आयोजित करण्यात आले आहे. वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे यांचे यंदाचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने संस्थेला आयोजनाचा मान मिळाला आहे, अशी माहिती वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेचे कार्याध्यक्ष भगवंत ठिपसे, कार्यवाह श्रद्धा परांजपे, प्रशांत पुंड यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

शुक्रवार, दि. 1 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता शोभायात्राचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर संमेलनाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन समारंभानिमित्त राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. डॉ. चारुदत्त आफळे यांचे ‌‘श्रीमद्‌‍ आद्य शंकराचार्य‌’ या विषयी कीर्तन होणार आहे.

शनिवार, दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 या कालावधीत ऋग्वेद, शुक्ल यजुर्वेद, माध्यन्दिन, शुक्ल यजुर्वेद काण्व, कृष्ण यजुर्वेद तैत्तिरीय आणि सामवेद राणायनीय मंत्रजागार होणार आहे. तसेच सकाळी 10 ते 11:30 या कालावधीत धर्मशास्त्रीय शंकासमाधान होणार आहे. 11:30 ते दुपारी 1 या वेळात उपनयन व विवाह या सोळा संस्कारांपैकी दोन महत्त्वाच्या संस्कारांविषयी परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 3:30 वाजता वेदशास्त्रसंपन्न विश्वासशास्त्री देशमुख (घोडजकर) यांचे ‌‘हिंदुत्व म्हणजे काय?‌’ या विषयी प्रवचन होणार आहे. सायंकाळी 5:30 वाजता वे. मू. भानुदास नरसिंह जोशी (ऋग्वेद घनपाठी), वे.मू. मंदार नारायण शहरकर (शुक्ल यजु. माध्यं. घनपाठी), वे. मू. राजेश गोविंद जहागिरदार (शुक्ल यजु. काण्व घनपाठी), वे. मू. किरण अरुण गोसावी (अथर्व वेद), वे. शा. सं. विश्वासशास्त्री देशमुख (घोडजकर) आणि विद्यावाचस्पती प्रा. शंकर अभ्यंकर यांचा विशेष सत्कार श्रीशारदापिठम्‌‍ शृंगेरीचे महाप्रबंधक पी. ए. मुरली यांच्या हस्ते होणार आहे. शृंगेरी विद्याभारती फाऊंडेशन, अमेरिकेचे चेअरमन डॉ. श्रीनिवास यज्ञसुब्रह्मण्यम्‌‍ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

रविवार, दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते 9 या कालावधीत सामवेद कौथुम, सामवेद जैमिनीय, अथर्ववेद शौनक, अथर्ववेद पैप्पलाद मंत्रजागर होणार आहे. सकाळी 10 ते 11:30 या वेळात ‌‘यज्ञीय वृक्षांचे समकालीन औचित्य‌’ या विषयावर वैद्य कौशिक दाते (सोलापूर) यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता वैदिक संमेलनाचा समारोप होणार आहे. या प्रसंगी वासुदेव निवास, पुणेचे पीठाधीश योगश्री प.पू. शरदराव जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार असून वेदशास्त्रोत्तेजक सभा,पुणेच्या अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक अध्यक्षस्थानी असणार आहेत. संमेलन सर्वांसाठी खुले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!