शैक्षणिक संस्था ह्या संस्कार व सद्विचारांची विद्यापीठे व्हावीत – परमपूज्य स्वरूपानंद सरस्वती स्वामीजी
डॉ. विश्वनाथ दा. कराड ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार’ ने सन्मानीत

पुणे,३० जुलै : “देशातील सर्व विद्यापीठांकडून अत्याधुनिक शिक्षण दिले जावे, मात्र संस्कार आणि सद् विचार हे जीवन घडविणारे असतात. त्यामुळेच शैक्षणिक संस्था या सद्विचारांचे विद्यापीठ व्हावेत. संस्कार हे जीवन घडविणारे, विचार तर्क शुद्ध असल्याने सुंदर नव पिढी निर्माण करू शकू.” असे विचार श्रुतिसागर आश्रम फुलगावचे संस्थापक परमपूज्य स्वरूपानंद सरस्वती स्वामी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने परमपूज्य स्वरूपानंद सरस्वती स्वामी यांच्या हस्ते एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार’ २०२५ या विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश, स्मृती चिन्ह, मानपत्र, पगडी, कवड्याची माळ आणि शेला प्रदान करण्यात आला. तसेच, इतिहास अभ्यासक डॉ. केदार फाळके यांना श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती २०२५ ने सन्मानीत करण्यात आले. त्यांना प्रशस्तीपत्रक, ५० हजार रुपयांचा धनादेश, कवड्याची माळ व पगडी देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, अमृत पुरंदरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे संचालक रवींद्र वंजारवाडकर होते. जाणता राजाचे कलाकार सुनील थोपटे यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.
स्वरूपानंद सरस्वती स्वामी म्हणाले,”बाबासाहेबांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार महान शिक्षणमहर्षिला दिला गेला आहे. योग्य पुरस्कार योग्य व्यक्तिला देणे हाही एक योगायोग आहे. मन हे माणसाला शुन्यापासून उच्च स्तरापर्यंत घेऊन जाते. तसेच ते उच्च स्तरापासून जमिनीपर्यंत ही आणते. अशा वेळेस काळानुरूप मनावर संस्कार घडविणारी शिक्षण पद्धती गरजेची आहे.”
सत्काराला उत्तर देतांना डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”जीवनभर विनम्रतेने कार्य करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंतरिक समाधानाची अनुभूती घेत आहे. सद्गुणांची पूजा हीच ईश्वराची पूजा आहे. बाबासाहेब वयाच्या शंभरीत पदार्पण करीत होते. तेव्हा त्यांची भेट घेतली. बाबासाहेब नेहमी नम्रतेने, लीनतेने बोलत. शिवरायांच्या जीवनाचे खरे दर्शन बाबासाहेबांनी राज्याला आणि देशाला एका वेगळ्या भूमिकेतून घडवले.”
डॉ. केदार म्हणाले,”बाबासाहेब पुरंदरे नेहमीच म्हणत असे की घाबरत असाल तर इतिहासाचा अभ्यास करू नका. इतिहास संशोधकाने सत्य कथन करावे, त्याने मागे कधीच हटू नये आणि कोणाचा अपमान ही करू नये. सातत्याने सत्याचा वेध घेऊन समस्यांच्या मुळापर्यंत पोहोचावे.”
रवींद्र वंजारवाडकर म्हणाले,” डॉ. विश्वनाथ कराड यांना बाबासाहेब यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार म्हणजे एका ध्यासपर्वाने दुसर्या ध्यासपर्वाचा केलेला सन्मान असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बाबासाहेबांनी इतिहासात जसे आहे तसेच मांडले, त्यांनी कधिही सत्येची मोडतोड केली नाही.”
त्यानंतर प्रदीप रावत आणि अमृत पुरंदरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी व राधा पुरंदरे आगाशे यांनी आभार मानले.



