हर घर तिरंगा” अभियानास आळंदीत उत्स्फूर्त प्रतिसाद :- मुख्याधिकारी खांडेकर

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : हर घर तिरंगा अभियानांतर्गत आळंदी नगरपरिषदेअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यां पासून नागरिक, कर्मचारी, महिला बचत गट, विविध संस्था यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले. आळंदी शहरात हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता स्पर्धा व विविध देशभक्तीपर व जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात ७ ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद शिक्षण विभाग शाळा क्रमांक दोन व चार या शाळां मधील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना स्वच्छतेचे महत्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. ८ ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद शाळा क्र. ३ येथे चित्रकला स्पर्धा तसेच तिरंगा राखी मेकिंग स्पर्धा, तिरंगा रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. ११ ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक ४ मध्ये स्वातंत्र्य दिना निमित्त “हस्ताक्षर स्पर्धा व माझे संविधान” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. १२ ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक चार मध्ये समूहगीत गायन स्पर्धा व चित्रकला स्पर्धा उत्साहात घेण्यात आली.
या उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, देशभक्ती आणि सामूहिक जबाबदारी यांचे प्रभावी संदेश देण्यात आले.“हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता” अभियानांतर्गत आळंदी शहरात घेतलेले हे विविध उपक्रम नागरिकांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारे ठरले असल्याचे मुख्याधिकारी खांडेकर यांनी सांगितले.