श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अन्नकोटात ५२१ पदार्थांचा महानैवेद्य
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजन

पुणे : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात लाडक्या गणरायासमोर अन्नकोट साकारत ५२१ पदार्थांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. मिठाई, फराळाच्या तिखट-गोड पदार्थांपासून विविध प्रकारच्या फळांची करण्यात आलेली आकर्षक आरास आणि विविध रसास्वादाचे पदार्थ बाप्पाला अर्पण करण्यात आले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबत मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली. याशिवाय तोरण आणि फुले, रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला.
यावेळी बोलताना ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे भाविकांना करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल ५२१ हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. तसेच बळीराजावर जे संकट आले आले, ते दूर होवो आणि महाराष्ट्र व संपूर्ण भारतात सुख-शांती नांदो अशी प्रार्थना यावेळी गणरायाचरणी करण्यात आली.



